WHO On Omicron Variant: कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा संसर्ग फैलावत आहे. ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतात ओमायक्रॉनबाधितांची संख्या 50 वर पोहचली आहे. जगातील बहुतांशी देशांमध्ये कोरोनाचा व्हेरियंट दाखल झाला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. जवळपास 77 देशांमध्ये हा व्हेरियंट फैलावला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी सांगितले.
डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी म्हटले की, ओमायक्रॉन आधी (डेल्टा, डेल्टा प्लस आदी) काही व्हेरियंट होते. मात्र, त्यांच्या तुलनेत हा व्हेरियंट अधिक वेगाने फैलावतो. ओमायक्रॉन व्हेरियंटचा सर्वात पहिले प्रकरण दक्षिण आफ्रिकेत समोर आले होते. लस पुरवठा असमानतेबाबत त्यांनी म्हटले की, जर आपण भेदभाव संपुष्टात आणला तर कोरोना महासाथीलाही संपुष्टात आणू शकतो. ही असमानता कायम राहणे म्हणजे आपण कोरोना महासाथीला आणखी फैलावण्यास आमंत्रण देण्यासारखे आहे.
फक्त लसीकरणाने कोरोना संसर्गाला अटकाव करता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले. कोरोना रोखण्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टेंसिंग आदी कोविड प्रतिबंधात्मक उपायांचाही वापर करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले
लसीकरणात असमानता
कोरोना लसीकरणाबाबत त्यांनी म्हटले की, लसीकरणाच्या प्रमाणात बरीच तफावत आहे. जवळपास 41 देशांनी अद्यापही आपल्या लोकसंख्येच्या 10 टक्के लोकांचेही लसीकरण केले नाही. तर, 98 टक्के देशांनी 40 टक्केही लसीकरण पूर्ण केले नाही. एकाच देशातील विविध समाजघटकातही लसीकरणाबाबत असमानता दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटना लशीच्या बुस्टर डोसच्या विरोधात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही लस पुरवठ्यातील असमानतेच्या विरोधात आहोत. प्रत्येकाचे प्राण वाचवणे हा आमच्यासमोरील मुख्य मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी याआधीदेखील लस पुरवठ्यातील असमानतेबाबत चिंता व्यक्त केली होती. जगातील मोजक्या श्रीमंत देशांनी मोठ्या प्रमाणावर लशींची आगाऊ नोंदणी केली होती. त्याच्या परिणामी गरीब, विकसनशील देशांना लसीकरणासाठी पुरेशा लशी उपलब्ध झाल्या नाहीत.