Vice President Election 2022 : उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया 19 जुलैपर्यंत चालणार आहे. 20 जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून 22 जुलैपर्यंत नावे मागे घेता येणार आहेत. 6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. विद्यमान उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे.


विशेष म्हणजे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्षही असतात. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) स्पष्ट आघाडी आहे.


उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक गोष्टी


निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केल्यानंतर उपराष्ट्रपतींची निवड करण्यास सांगून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होते. उमेदवाराच्या नामनिर्देशन पत्रावर 20 प्रस्तावक आणि 20 अनुमोदकांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. एक मतदार उमेदवाराच्या केवळ एका नामनिर्देशनपत्रावर प्रस्तावक किंवा अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करू शकतो. उमेदवार जास्तीत जास्त चार उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो. निवडणुकीसाठी अनामत रक्कम 15 हजार रुपये आहे.


मतदान कोण करतात?


लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र आहेत, ज्यामध्ये नामनिर्देशित सदस्यांचाही समावेश आहे. या निवडणुकीसाठी निर्वाचित मंडळातील संसदेच्या दोन्ही सभागृहांतील 788 सदस्यांचा समावेश आहे.  निर्वाचित मंडळाचे सर्व सदस्य संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य असल्याने, प्रत्येक संसद सदस्याच्या मताचे मूल्य समान असेल, म्हणजेच एक.


मतदान प्रक्रिया काय आहे?


निवडणूक गुप्त मतदानाने घेतली जाते. या प्रणालीमध्ये मतदाराला उमेदवारांच्या नावासमोर पसंती दर्शवावी लागते. मतदारांनी निष्ठेने मतदानाची गुप्तता पाळणे अपेक्षित आहे. या निवडणुकीत खुल्या मतदानाची संकल्पना नसून अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत कोणालाही मतपत्रिका दाखवण्यास सक्त मनाई आहे.


मतदान प्रक्रियेच्या उल्लंघनासाठी कारवाई


1974 च्या नियमांमध्ये दिलेल्या मतदान प्रक्रियेत अशी तरतूद आहे की मतदान कक्षात मत चिन्हांकित केल्यानंतर, मतदाराने मतपत्रिका दुमडून मतपेटीत टाकली पाहिजे. मतदान प्रक्रियेचे कोणतेही उल्लंघन झाल्यास पीठासीन अधिकारी बॅलेट पेपर रद्द करेल.


इतर महत्त्वाच्या बातम्या