Hotels And Restaurant Service Charge: तुम्ही जर हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये नेहमी जेवायला जात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) ने सोमवारी जाहीर केले की, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवस्थापनाला यापुढे सर्व्हिस चार्ज (Service Charge) आकारता येणार नाही. CCPA ने रेस्टॉरंटमधील फूड बिलामध्ये आपोआप जोडल्या जाणाऱ्या सर्व्हिस चार्जवर बंदी घातली आहे. एवढेच नाही तर या आदेशानंतरही जर हॉटेल किंवा रेस्टॉरंटकडून सर्व्हिस चार्ज वसूल केला जात असेल तर तुम्ही त्याबाबत तक्रार करू शकता, असे सीसीपीएने म्हटले आहे.
गेल्या काही काळापासून हॉटेल्स आणि रेस्टॉरंटकडून आकारल्या जाणाऱ्या सर्व्हिस चार्जवरून सातत्याने वाद होत आहेत. वाढत्या तक्रारींदरम्यान, CCPA ने सर्व्हिस चार्जवर बंदी घालणारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वात असे म्हटले आहे की, "कोणतेही हॉटेल किंवा रेस्टॉरंट आपोआप किंवा डीफॉल्टनुसार बिलामध्ये सर्व्हिस चार्ज जोडू शकत नाही." सेवा शुल्क इतर कोणत्याही नावाने वसूल करू नये, असेही त्यात नमूद केले आहे.
सर्व्हिस चार्ज भरण्याची सक्ती करता येणार नाही
कोणतेही हॉटेल किंवा रेस्टॉरंट ग्राहकाला सर्व्हिस चार्ज भरण्यास सक्ती करू शकत नाही. सर्व्हिस चार्ज ऐच्छिक आणि वैकल्पिक असल्याचे त्यांना ग्राहकाला स्पष्टपणे सांगावे लागेल. याचा अर्थ ग्राहक एकतर सर्व्हिस चार्ज भरू शकतो किंवा तो भरण्यास नकार देऊ शकतो. सर्व्हिस चार्जच्या नावाखाली ग्राहकांच्या प्रवेशावर कोणतेही बंधन नाही, असे मार्गदर्शक तत्त्वात पुढे म्हटले आहे. तसेच सर्व्हिस चार्ज फूड बिलात जोडून आणि एकूण रकमेवर जीएसटी लागू करून वसूल करता येणार नाही.
तुम्ही हेल्पलाइनवर तक्रार करू शकता
एखाद्या ग्राहकाला हॉटेल किंवा रेस्टॉरंट मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून सर्व्हिस चार्ज आकारत असल्याचे आढळल्यास, तो रेस्टॉरंटला बिलाच्या रकमेतून काढून टाकण्याची विनंती करू शकतो. ग्राहक इच्छित असल्यास राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (NCH) वर तक्रार नोंदवू शकतात. यासाठी तुम्हाला 1915 वर कॉल करावा लागेल. यासोबतच तुम्ही ग्राहक आयोगाकडे तक्रारही करू शकता.