मंडालेतल्या भारतीय वकिलातीच्या कक्षाला लोकमान्यांचं नाव देणार, स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त आंतरराष्ट्रीय वेबिनारला अमित शाह संबोधणार
स्वराज ते आत्मनिर्भर भारत या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनारचं आयोजन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेकडून करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संबोधनानं या वेबिनारची सुरुवात होणार आहे.
नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातले अग्रणी नेते लोकमान्य टिळक यांचं स्मृतीशताब्दी वर्ष 1 ऑगस्ट 2020 पासून सुरु होतंय. त्यानिमित्तानं स्वराज ते आत्मनिर्भर भारत या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनारचं आयोजन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेकडून करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संबोधनानं या वेबिनारची सुरुवात होणार आहे.
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे चेअरमन आणि राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी यानिमित्तानं होणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. या आंतरराष्ट्रीय वेबिनारचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते तर समारोप गुरुमूर्ती यांच्या हस्ते होणार आहे. टिळकांवर प्रदीर्घ लिखाण करणारे डॉ. सदानंद मोरे, रायपूरचे अभ्यासक सुशील त्रिवेदी, कुरुक्षेत्र विद्यापीठातले राघवेंद्र तन्वर यांच्यासह इतर अनेक मान्यवर या वेबिनारमध्ये भाग घेणार आहेत.
हे स्मृतीशताब्दी वर्ष ज्या मंडाले तुरुंगात टिळकांनी कारावास भोगला, त्याच ठिकाणी जाऊन साजरं करण्याचा परिषदेनं ठरवलं होतं, मात्र कोरोनाच्या संकटामुळे हा कार्यक्रम स्थगित करावा लागला. पण कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर याचवर्षी मंडालेत जाऊन हा कार्यक्रम वेगळ्या रुपानं करण्याचा निर्धार परिषदेनं व्यक्त केला आहे. शिवाय मंडालेतल्या भारतीय वकिलातीच्या कक्षाला लोकमान्य टिळक यांचं नाव देण्यात यावं यासाठीही प्रयत्न सुरु असल्याचं विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलं. टिळकांचं योगदान हे केवळ राजकीय चळवळीपुरतं नव्हतं तर ते सांस्कृतिक उन्नतीच्या दृष्टीनंही महत्वाचं होतं. आजकाल दुर्दैवानं महापुरुषांना ठराविक समाजापुरतं बांधून ठेवलं जातं, पण त्यामुळे अशा महापुरुषांच्या कामाची उंची कमी होते. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात अद्याप लोकमान्य टिळकांचा पुतळा लागला नाही हे दुर्दैव असल्याची खंतही खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी बोलून दाखवली.