हैदराबाद : स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर तेलंगण सरकारने दोन नवीन योजना जाहीर केल्या. या योजनांच्या जाहिरातीसाठी एका महिलेचा फोटो तिच्या परवानगीविना छापण्यात आला. त्याहून महत्त्वाचं म्हणजे एका जाहिरातीत तिच्यासोबत पतीचा फोटो आहे, तर दुसऱ्या जाहिरातीत पतीच्या जागीच भलत्याच माणसाचा चेहरा लावल्याने महिलेने संताप व्यक्त केला आहे.
तेलंगण सरकारने 15 ऑगस्टला जाहीर केलेल्या दोन नव्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी दोन पूर्णपानी जाहिराती वृत्तपत्रात छापण्यात आल्या होत्या. यामध्ये पती-पत्नी आणि लहान मूल असं कुटुंब दिसत आहे. कांती वेलुगू (मोफत नेत्र सुरक्षा) आणि रायतु भीमा (28 लाख शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत विमा कवच) अशा या दोन योजना आहेत.
दोन जाहिरातींमधील महिला आणि बाळ तेच असताना पती वेगळा असल्याचं अनेक जणांच्या लक्षात आलं आणि सोशल मीडियावर टीका करण्यास सुरुवात झाली.
त्यातच, आपला फोटो परवानगी न घेताच वापरल्याचा दावा संबंधित महिलेने केला. आपण शेतकरी नसल्याचंही तिने स्थानिक मीडियाशी बोलताना सांगितलं. कुटुंबाचा फोटो छापायचाच होता, तर पतीच्या ठिकाणी दुसऱ्या माणसाचा फोटो का लावला, असा संतप्त सवालही तिने विचारला आहे.
'एके दिवशी पाच-दहा जण कॅमेरा घेऊन आले. मशिनसाठी तुम्हाला कर्ज देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं. आमची सही घेतली आणि कुटुंबाचा फोटो काढला. आम्ही अशिक्षित असल्यामुळे कशावर सह्या घेतल्या, ते माहिती नाही' असं त्या महिलेचं म्हणणं आहे.
'अचानक आमचे पोस्टर बस आणि वृत्तपत्रांमध्ये झळकले. कोणाला विचारावं, हेच आम्हाला समजत नव्हतं. एका फोटोमध्ये माझ्यासोबत पती होता, तर दुसऱ्या फोटोत वेगळ्याच माणसाचा चेहरा दिसत होता. हे पाहून आमच्या आजूबाजूचे लोक काय म्हणतील?' अशा विवंचनेत ती महिला पडली आहे.
माहिती आणि जनसंपर्क कार्यालयाने संबंधित अॅड एजन्सीला समन्स बजावलं आहे. फोटो वापरण्यापूर्वी महिलेची परवानगी घेतली होती का, याविषयी उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
तेलंगणा सरकारच्या जाहिरातीत महिलेसोबत वेगवेगळ्या 'पती'चा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Aug 2018 11:11 AM (IST)
तेलंगण सरकारने 15 ऑगस्टला जाहीर केलेल्या दोन नव्या योजनांच्या जाहिराती छापल्या, मात्र त्यामध्ये महिलेचा पती म्हणून दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे फोटो दाखवले
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -