नवी दिल्ली : यूपीएससी परीक्षेत आपल्या अंधत्वावर मात करत यश मिळवणाऱ्या जयंत मंकले या विद्यार्थ्यावर आपल्या गुणवत्तेच्या जोरावर मिळवलेल्या पोस्टसाठी सरकार दरबारी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. मागच्या वर्षी झालेल्या यूपीएससी परीक्षेत जयंतने संपूर्ण देशातून 923वा क्रमांक पटकावला.


मात्र या यशानंतरही केवळ त्याच्या अंधत्वामुळे यूपीएससी त्याला कुठलीच पोस्ट सध्या द्यायला तयार नाही. दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पोस्टमधील काही पोस्ट भरल्या गेलेल्या नाहीत. तरीही हा प्रकार सुरू आहे. याचं कारण सांगितलं जातंय ते देखील संतापजनक आहे.


सध्या ज्या पोस्ट रिक्त आहेत, त्या पूर्ण अंधत्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नाहीत. त्या जागांवर ते काम करू शकणार नाही. इंडियन फॉरेन सर्विस, इंडियन रेल्वे पर्सनल इंडियन सिव्हिल अकाउंट सर्विस या सेवा रिक्त असूनही त्या दिल्या गेलेल्या नाहीत.


विशेष म्हणजे यूपीएससी परीक्षा घेताना दृष्टिहीन विद्यार्थ्यांमध्ये कमी अंधत्व, पूर्ण अंधत्व असा भेद करत नाही. मग नेमका पोस्ट देतानाच हा भेद का? आणि उलट पूर्ण अंध असलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा पास करण्यासाठी जास्त त्रास सहन करावा लागतो, ही बाब प्रशासनाच्या डोक्यात शिरायला तयार नाही. त्यामुळे आता आपल्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी जयंतनं पंतप्रधानांना साकडे घालायचे ठरवलं.


दिव्यांग शब्द आणून अपंगांबद्दलची आपली संवेदना दाखवणारे पंतप्रधान आता या प्रकरणाकडे गांभीर्याने बघून जयंतला न्याय मिळवून देणार का हा प्रश्न आहे. यूपीएससी परीक्षेत आपल्या अपंगत्वावर मात करत जिद्दीने यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने झगडावे लागल्याची याआधीही उदाहरणे आहेत.


दोन वर्षांपूर्वी प्रांजल पाटील या विद्यार्थिनीला ही अशाच पद्धतीने सरकारी असंवेदनशीलतेचा अनुभव आला होता. मात्र नंतर दुसऱ्या प्रयत्नात तिने सगळ्यांच्या नाकावर टिच्चून यश मिळवलं. सध्या ती आयएएस म्हणून काम करत आहे.