Tata Motors : टाटा मोटर्सकडून गुजरातमधील Ford इंडियाचा प्लांट 750 कोटींना खरेदी, EV वाहनांचं उत्पादन वाढवण्यावर भर
Tata Motors Buys Ford India Plant : फोर्डकडून भारतात होत असलेल्या नुकसानीमुळे भारतीय बाजारातून माघार घेत असल्याचं सांगत आपला गाशा गुंडाळला
Tata Motors : टाटा मोटर्सकडून गुजरातच्या (Gujarat) साणंदमधील फोर्ड इंडियाचा (Ford India) प्लांट 750 कोटींना खरेदी करण्यात येणार आहे, आज या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. टाटा मोटर्स (Tata Motors) साणंदमधील फोर्डच्या प्लांटमध्ये ईव्ही वाहनांची (EV) निर्मिती होणार असून भारतातील ईव्ही वाहनांचं उत्पादन वाढवण्यावर टाटा मोटर्सचा भर असणार आहे.
असेंब्ली युनिट आणि इंजिन मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचा समावेश
460 एकर परिसरात पसरलेल्या फोर्डच्या साणंदमधील या प्लांटमध्ये प्रामुख्याने वाहन असेंब्ली युनिट आणि इंजिन मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचा समावेश आहे. मागच्या वर्षी फोर्डकडून भारतातील गाड्याचं मॅन्युफॅक्चरिंग बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर साणंदच्या फोर्डच्या प्लांटबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या.
4 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगाराची कुऱ्हाड
फोर्ड कंपनीचे भारतात दोन प्लांट होते, ज्यातील एक साणंद येथील प्लांट टाटा मोटर्सकडे तर दुसरा चेन्नईत असलेल्या प्लांटला मात्र अद्यापही कोणी वाली नाही. दरम्यान, चेन्नईमधील फोर्डच्या गाड्यांचं उत्पादन थांबल्याने तोही आता ठप्प झाल्याचं समजतंय. फोर्डकडून भारतात होत असलेल्या नुकसानीमुळे भारतीय बाजारातून माघार घेत असल्याचं सांगत आपला गाशा गुंडाळला, 4 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे.
इलेक्ट्रीक वाहनांवर भर
फोर्ड कंपनीकडून यापुढे इलेक्ट्रीक वाहनांवर भर देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय, यासाठी अमेरिकेत नव्याने 4 प्लांटची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.