चेन्नईः तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं  चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झालं. त्या 68 वर्षांच्या होत्या. जयललितांच्या रुपाने दक्षिण भारताच्या राजकारणातील दिग्गज चेहरा काळाच्या पडद्याआड गेला आहे.

सोमवारी रात्री ११.३० वाजता अपोलो रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. जयललितांना उपचारासाठी 22 सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी त्यांना 'कार्डिअॅक अरेस्ट' आल्यामुळे त्यांची प्रकृती खूपच चिंताजनक होती.

जयललिता तामिळनाडूमध्ये 'अम्मा' या नावाने परिचित होत्या. लाखो समर्थक जयललितांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत होते, मात्र अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली.

दरम्यान, तामिळनाडूत सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तर तीन दिवस शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

जयललिता यांच्या पार्थिवावर संध्याकाळी 4 वा  तामिळनाडूतील मरिना बीचवर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

पन्नीरसेल्वम मुख्यमंत्रीपदी

जयललिता यांच्या निधनाची घोषणा होताच पनीरसेल्वम यांची तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली.

एवढंच नाही तर मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधीही उरकून घेण्यात आला.. त्यामुळं जयललिता यांच्यानंतर ओ.पनीरसेल्वम हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. पनीरसेल्वम हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत.

रविवारी रात्री जयललिता यांनी हृदयविकाराचा झटका आल्यापासूनच त्यांच्या प्रकृती ढासळत होती..त्यामुळे रविवारी रात्री अपोलो रुग्णालयातच तामिळनाडू मंत्रिमंडळाची आपात्कालीन बैठकही घेण्यात आली होती. त्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चाही करण्यात आली होती.

पनीरसेल्वम हे जयललिता यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. जयललिता यांना जेव्हा तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. तेव्हा मुख्यमंत्रीपदी पनीरसेल्वम यांची निवड करण्यात आली होती. पण शपथविधीच्या कार्यक्रमात जयललितांच्या अनुपस्थितीमुळे त्यांना भर शपथविधी कार्यक्रमात अश्रूही अनावर झाले होते.

जयललितांची कारकीर्द

*24 फेब्रुवारी 1948 रोजी जयललितांचा जन्म झाला. करिअरची सुरुवात सिनेमा क्षेत्रातून केली. तामिळ, तेलुगू आणि कन्नड या तीन भाषेतील 140 चित्रपटांमध्ये जयललितांनी काम केलं आहे.

*1960 ते 1980 या कालावधीत त्या सिनेमा क्षेत्रात सक्रीय होत्या.

*एम. जी. रामचंद्रन यांच्या प्रेरणेतून 1982 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

*1983 मध्ये पोटनिवडणुकीतून पहिल्यांदाच आमदार झाल्या.

*त्यानंतर 1984 मध्ये राज्यसभेवर निवडून गेल्या.

*रामचंद्रन यांच्या निधनानंतर जयललितांनी 'एआयएडीएमके' पक्षाची सूत्रं स्वीकारली.

*1989 मध्ये विरोधी पक्ष नेतेपद भूषवलं आणि तामिळनाडूच्या पहिल्या महिला विरोधी पक्ष नेत्या होण्याचा बहुमान मिळाला.

*24 जून 1991 रोजी तामिळनाडूच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

*1996 च्या निवडणुकीत जयललितांचा मोठा पराभव झाला. भ्रष्टाचार, विकास कामांच्या अभावामुळे जनतेनं जयललितांना नाकारलं.

*2001 मध्ये भ्रष्टाचार प्रकरणी जयललितांना 30 दिवसांचा तुरुंगवास झाला.

*जयललिता 2001 मध्ये दुसऱ्यांदा तामिळनाडुच्या मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्या.

*2011 मध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली.

*2014 मध्ये बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी 4 वर्षांची शिक्षा आणि 100 कोटींचा दंड ठोठावण्यात आला.

*2015 मध्ये बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली. निर्दोष मुक्तता झाल्यानंतर जयललिता 2015 मध्ये पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या.

*5 डिसेंबरबर 2016 रोजी दीर्घ आजाराने चेन्नईतील अपोलो रुग्णालयात मृत्यू झाला.

संबंधित बातम्या
पहिल्यांदा स्कर्ट घालणारी अभिनेत्री ते मुख्यमंत्री, जयललितांचा प्रवास

जयललिता यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती चिंताजनक

हॉस्पिटलबाहेर जयललिता समर्थकांचं ठाण, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

जयललिता यांना मोठा दिलासा, हायकोर्टाकडून दोषमुक्त, पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा 

जयललितांच्या चाहत्याने स्वत:ला येशूप्रमाणे हातात खिळे ठोकून क्रॉसवर लटकवलं

जयललितांचा उल्लेख दोषीअसा केल्याने सभागृहातून आमदारांचं निलंबन

जयललितांना 10 वर्षे निवडणूक लढवता योणार नाही!

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना जामीन मंजूर 

जयललितांना शिक्षा झाल्याने तामिळनाडूत 16 जणांचा मृत्यू  

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना ओ. पनीरसेल्वम ढसासढसा रडले  

जयललिताकैदी नंबर 7402, मु.पो. बंगलोर कारागृह!

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना चार वर्षाचा कारावास, जयललितांनी मुख्यमंत्रीपद गमावलं