चेन्नई : उपचार सुरु असताना तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं निधन झाल्याचं चुकीचं वृत्त दिल्याने, स्थानिक वृत्तवाहिनी 'थंथी' टीव्हीवर दगडफेक झाली आहे. इतकंच नाही तर जयललितांच्या समर्थकांनी या वृत्तवाहिनीच्या कार्यालयावर पेट्रोल गोळे फेकले.
जयललितांवर अपोलो रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जयललितांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाकडून सातत्याने मेडिकल बुलेटीन देण्यात येत आहे.
मात्र रुग्णालयाकडून सातत्याने उपचार सुरु असल्याची माहिती देऊनही स्थानिक वृत्तवाहिनीने त्यांच्या निधनाची चुकीची बातमी दिली. त्यामुळे चिडलेल्या समर्थकांनी वृत्तवाहिनीवर हल्लाबोल केला.
दरम्यान, जयललितांबाबत चुकीचं वृत्त पसरल्याचं पाहून, अपोलो रुग्णालयानेही पत्रक प्रसिद्ध करुन, जयललितांवर उपचार सुरु असल्याचं स्पष्ट केलं. त्यांची प्रकृती चिंताजनक असली, तरी त्यांच्यावर शक्य ते सर्व उपचार सुरु आहेत.