CJI : देशाचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून यू. यू. लळीत आज घेणार शपथ; अडीच महिन्यांचा असणार कार्यकाळ
CJI UU Lalit Swearing-in Ceremony : देशाचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून न्या. यू. यू. लळीत आज शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ देतील.
CJI UU Lalit Swearing-in Ceremony : न्या. उदय उमेश लळीत हे आज भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ देणार आहेत. एन. व्ही. रमण्णा हे 26 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाले होते. नवे सरन्यायाधीश न्या. उदय लळीत यांचा कार्यकाळ हा तीन महिन्यांपेक्षाही कमी असणार आहे. ते 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.
न्या. उदय लळीत हे वकिली करत असताना क्राइम लॉमध्ये विशेष प्राविण्यासाठी ओळखले जायचे. अनेक गुन्हेगारीशी संबंधित अनेक खटल्यात त्यांनी आपल्या अशीलांची बाजू प्रभावीपणे मांडली आहे. कायद्याची जाण, मृदू स्वभाव, बिनतोड युक्तिवादासाठी ते ओळखले जात असे. न्या. लळीत यांनी 1983 मध्ये महाराष्ट्र आणि गोवा बार काउंसिलमध्ये वकील म्हणून कारकिर्दीत सुरूवात केली होती. 1985 पर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली. त्यानंतर 1986 मध्ये ते दिल्लीत स्थायिक झाले.
असाही एक विक्रम
कोणत्याही हायकोर्टाचे न्यायाधीश नसतानाही न्या. लळीत हे देशाचे सरन्यायाधीश होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील ही दुसरी घटना आहे. याआधी 1971 मध्ये देशाचे 13 वे सरन्यायाधीश एस.एम. सिकरी यांनी ही किमया साधली होती.
अयोध्या-बाबरी खटल्यातून स्वत: ला वेगळं केलं
अयोध्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या पाच सदस्यीय खंडपीठातून न्या. उदय लळीत यांनी स्वत: माघार घेतली. या प्रकरणाशी निगडीत असलेल्या एका गुन्हेगारी खटल्यात त्यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या बाजूने खटला लढवला होता. याच कारणास्तव न्या. लळीत यांनी खंडपीठातून माघार घेतली होती.
महाराष्ट्राशी संबंध
न्या. लळीत यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1957 रोजी सोलापूरमध्ये झाला. त्यांचे कुटुंबिय मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. न्यायमूर्ती लळीत यांच्या घराण्यात वकिली पिढीजात चालत आलेली आहे. आजोबा, चार काका आणि त्यांचे वडील सर्वजण वकिलीच करायचे. उदय लळीत यांचे आजोबा वकिली करण्यासाठी आपटे येथून सोलापूर येथे जाऊन स्थायिक झाले. त्यांची आजी त्याकाळी भारतात डॉक्टर झालेल्या काही मोजक्या स्त्रियांपैकी एक 'एलसीपीएस' डॉक्टर होत्या. त्यामुळे बुद्धिमत्ता, व्यवसाय, चातुर्य आणि अभ्यासवृत्ती रक्तातूनच आलेली. उदय लळीत यांचे वडील अॅड. उमेश लळीत हेही मुंबई उच्च न्यायालयाने नामनिर्देशित केलेले ज्येष्ठ वकील होते. ते 1974 ते 76 या काळात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे माजी अतिरिक्त न्यायाधीश होते. या पार्श्वभूमीवर मुंबईत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले.