नवी दिल्ली : भारताची फुलराणी सायना नेहवाल भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली मुख्यालयात सायनाचा पक्षप्रवेश झाला आहे. भाजप प्रवेशानंतर सायना नेहवाल दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारही करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सायनासोबत तिच्या बहिणीनेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याआधी अनेक खेळाडूंनी भाजपमध्ये प्रवेश केला होता तसेच निवडणूकही लढवली होती. कुस्तीपटू योगेश्वर दत्त, बबिता फोगाट यांनी हरयाणा विधानसभा आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर याने भाजपाच्या चिन्हावर लोकसभा निडवणुक लढवली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत सायना नेहवालही निवडणुकीच्या रिंगणात दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हरियाणाच्या हिसारमध्ये जन्मलेली सायनाचा समावेश जगभरातील उत्कृष्ट बॅडमिंटनपटूंमध्ये केला जातो. सध्या सायना जगभरातील आठव्या क्रमांकावर आहे.
सायना नेहवालने अनेकदा आंतराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव उज्जव केलं आहे. मोठ्या पडद्यावरही सायना नेहवालचा बायोपिक लवकरच झळकणार आहे. परिणीती चोप्रा या बायोपिकमध्ये सायनाची भूमिका साकारताना दिसणार आहे. बॅडमिंटनमध्ये दमदार कामगिरी केल्यामुळे सायना नेहवालला राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार आणि अर्जुन अवॉर्डने गौरवण्यात आलं आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये सायना नेहवालने देशासाठी ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं.
सायना नेहवाल 24 आंतराष्ट्रीय बॅडमिंटन टूर्नामेंट जिंकल्या आहेत. 2015मध्ये सायना नेहवालला जगातील पहिल्या क्रमांकाच्या बॅडमिंटन खेळाडूचा मान मिळाला होता. सायना हरियाणातील राहणारी आहे. परंतु, लहानपणापासून ती हैदराबादमध्ये राहिली आहे. तसेच तिचं शिक्षण आणि बॅडमिंटन ट्रेनिंगही हैदराबाद येथेचं झालं होतं.
सायनाने काही दिवसांपूर्वी नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाचं समर्थन केलं होतं. भाजप सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायना नेहवाल भाजप प्रवेशानंतर दिल्ली विधानसभेसाठी प्रचारही करणार की नाही, याबाबत काही दिवसांनी माहिती देण्यात येईल.
संबंधित बातम्या :
धोनीची जागा रिकामीच, टीम इंडियातले सहकारी म्हणतायत 'मिस यू माही!'