ऑकलंड : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या टीम इंडियामधील कमबॅकबाबत आणि त्याच्या निवृत्तीबाबत दररोज नवनवीन बातम्या येत आहेत. परंतु आज धोनीबाबतची जी बातमी आली आहे, ती पाहून धोनीचे चाहते भावूक होतील.


टीम इंडियाचा फिरकीपटू यजुवेंद्र चहल याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने धोनीबाबत आश्चर्यकारक खुलासा केला आहे. टीम इंडियाचे शिलेदार ज्या बसमधून मैदानात दाखल होते, त्या बसमध्ये आजही एम. एस. धोनीची सीट (जागा) रिकामी ठेवली जाते. त्या सीटवर कोणताही खेळाडू बसत नाही.


टीम इंडियाचे खेळाडू ऑकलंडमध्ये विमानतळावरुन बसमधून स्टेडियमकडे जात असताना यजुवेंद्र चहलने एक व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये चहल सुरुवातीला जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, मोहम्मद शमी आणि के. एल. राहुल यांच्याशी बोलतो. त्यानंतर चहल एका रिकाम्या सीटजवळ पोहोचतो आणि सांगतो की, या सीटवर एक लेजेंड खेळाडू बसायचा. आज तो या गाडीत नाहीए. परंतु त्याच्या अनुपस्थितीत त्याची सीट आम्ही रिकामी ठेवली आहे.


चहल म्हणाला की, इथे लेजेंड(एमएस धोनी) बसायचे. आता इथे कोणीही बसत नाही. आम्ही तुम्हाला खूप मिस करतोय माही भाय. धोनी टीम इंडियासोबत बसमधून प्रवास करत असताना कायम शेवटच्या विंडो सीटवर (उजव्या बाजूला) बसायचा. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून तो टीम इंडियापासून लांब आहे.


वाचा : धोनी पुनरागमनाच्या तयारीत, नेट्समध्ये माहीचा कसून सराव


दोन आठवड्यांपूर्वी बीसीसीआयने आगामी मोसमासाठी टीम इंडियाच्या संभाव्य शिलेदारांची कॉन्ट्रॅक्ट यादी जाहीर केली आहे. या यादीत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा समावेश करण्यात आलेला नाही. बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट यादीत ए प्लस, ए, बी, सी या चार श्रेणींचा समावेश आहे. गत मोसमात धोनीचा समावेश पाच कोटी रुपयांचं वार्षिक मानधन असलेल्या ए श्रेणीत होता. पण यंदा त्याला एकाही श्रेणीच्या कॉन्ट्रॅक्ट यादीत समावून घेण्यात आलेलं नाही. कॉन्ट्रॅक्ट यादीमधून वगळत बीसीसीआयने धोनीच्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत, असे बोलले जात आहे.


धोनी कसोटी क्रिकेटमधून 2014 सालीच निवृत्त झाला आहे. सध्या तो केवळ एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्येच भारताचं प्रतिनिधित्व करत होता. इंग्लंडमधल्या विश्वचषकानंतर धोनीने एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमधून सातत्याने माघार घेतली किंवा त्याला खेळवण्यात आलेलं नाही. त्यामुळे आता बीसीसीआयने धोनीला कॉन्ट्रॅक्ट देण्याचं टाळून, त्याला वेळीच निवृत्त होण्याचे संकेत दिले असल्याचे बोलले जात आहे.


विश्वचषक स्पर्धा झाल्यापासून धोनी टीम इंडियापासून दूर
विश्वचष स्पर्धेतील सेमीफायनल सामन्यात (न्यूझीलंडविरोधात) धोनी शेवटचा मैदानात दिसला होता. तेव्हापासून धोनी टीम इंडियापासून दूर आहे. भारताला तीन्ही आयसीसी ट्रॉफी जिंकवून देणारा कर्णधार ही धोनीची प्रमुख ओळख आहे. धोनीने आतापर्यंत 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. यामध्ये त्याने 10 हजार 773 धावा फठकावल्या आहेत. तर 90 कसोटी सामन्यांमध्ये धोनीने 4876 धावा जमवल्या आहेत.


व्हिडीओ पाहा