पोचेफस्ट्रम : प्रियम गर्गच्या भारतीय संघानं U19 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा 74 धावांनी धुव्वा उडवून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 234 धावांचं आव्हान दिलं होतं. पण कार्तिक त्यागी आणि आकाश सिंगच्या माऱ्यासमोर कांगारुंचा डाव 159 धावांत आटोपला.
कार्तिक त्यागीनं चार तर आकाश सिंगनं तीन फलंदाजांना माघारी धाडलं. त्याआधी मुंबईकर यशस्वी जैस्वाल आणि अथर्व अंकोलेकरच्या दमदार अर्धशतकांमुळे भारतानं 50 षटकांत नऊ बाद 233 धावांची मजल मारली होती. यशस्वी जैस्वालनं 6 चौकार आणि 2 षटकारांसह 62 धावांची खेळी केली. तर अथर्वनं पाच चौकार आणि एका षटकारासह नाबाद 55 धावांचं महत्वपूर्ण योगदान दिलं. या दोघांच्या दमदार खेळींच्या जोरावर भारताला ऑस्ट्रेलियापुढे 234 धावांचे आव्हान ठेवता आले.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. प्रथम फलंदाजी करताना भारताचे पहिले तीन फलंदाज 54 धावांत माघारी परतले होते. पण त्यावेळी एका बाजूने यशस्वीनं दमदार फलंदाजी केली. यशस्वी बाद झाल्यावर अथर्वने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. अथर्वने अखेरच्या षटकापर्यंत फलंदाजी केली. भारतीय संघाला धावसंख्या उभारून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. अथर्वने 5 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 55 धावांची खेळी केली. त्यामुळेच भारताला 233 धावा करता आल्या.
ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात
ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच चेंडूवर फ्रेजर मॅकगर्ग रन आउट झाला. ऑस्ट्रेलियाच्या महत्वाच्या चार फलंदाजांना त्यागीने माघारी धाडले. 17 धावांवर पोहोचता पोहोचता ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज माघारी परतले होते. त्यामुळे U19 च्या विश्वचषकाच्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या विजयाचा खरा मानकरी कार्तिक त्यागी असल्याचं बोललं जात आहे.
संबंधित बातम्या :
धोनीची जागा रिकामीच, टीम इंडियातले सहकारी म्हणतायत 'मिस यू माही!'
IPL 2020 | ठरलं...! आयपीएल 2020ची फायनल 'या' शहरात; 24मे रोजी ठरणार विजेता
महान बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट आणि मुलीचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
INDvsNZ | टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा सहा विकेट्सनी धुव्वा, लोकेश राहुल, श्रेयसची धडाकेबाज फलंदाजी