(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SOVA Virus : सोवा व्हायरस तुमच्या खात्यातील सर्व पैसे उडवू शकतं, SBI चा ग्राहकांना इशारा
SOVA Trojan : एखाद्या अॅपच्या माध्यमातून हे व्हायरस तुमच्या फोनमध्ये प्रवेश करण्याची आणि बँकिंगशी संबंधित सर्व माहिती चोरण्याची शक्यता आहे.
मुंबई : जर तुम्ही कोणतंही अॅप डाऊनलोड करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सोवा मालवेअरमुळे (SOVA Trojan) तुमच्या बँक खात्यातील सर्व पैसे उडू शकतात असा इशारा स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांना दिला आहे. अॅपच्या माध्यमातून हे वायरस तुमच्या फोनमध्ये प्रवेश करेल आणि तुमच्या किमती असेट्सवर डल्ला मारु शकेल असं एसबीआयने सांगितलं आहे. कॅनरा बँकेनेही (Canara Bank) त्याच्या ग्राहकांना ही खबरदारीची सूचना दिली आहे. ही सूचना खासकरून अॅन्ड्राईड फोनसाठी आहे.
Don't let malware steal your valuable assets. Always download the trusted apps from reliable sources only. Stay Alert and #SafeWithSBI#SBI #AmritMahotsav #CyberSafety #CyberSecurity #StayVigilant #StaySafe pic.twitter.com/NwAfUle36V
— State Bank of India (@TheOfficialSBI) September 22, 2022
काय आहे सोवा व्हायरस?
एसबीआयने दिलेल्या इशाऱ्यानुसार, सोवा हे एक ट्रोजन मालवेअर आहे, जे बँकिंग अॅप्स वापरणाऱ्या ग्राहकांच्या पर्सनल डेटावर डल्ला मारते. यासंबंधीची सर्व गुप्त माहिती चोरली जाते. ज्या वेळी तुम्ही तुमचे बँकिंग अॅप वापरत असाल त्यावेळी हे मालवेअर क्रेडेंशियल्स रेकॉर्ड करते. याला ओळखणे आणि बाहेर काढणे हे अवघड आहे.
सोवा मालवेअर असं काम करतं
सुरुवातीला एका फेक मेसेजच्या माध्यमातून हे तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल होतं. त्यानंतर हे ट्रोजन तुमच्या सध्याच्या सर्व अॅप्सची माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचवतं. नंतर हॅकर्स कमांड आणि कंट्रोलच्या माध्यमातून तुमच्या फोनमध्ये एक व्हायरस पाठवतो. त्याचसोबत एक यादीही पाठवली जाते ज्यामध्ये टार्गेट करण्यात येणाऱ्या अॅप्सची माहिती असते. जर या अॅप्सचा तुम्ही वापर केला तर व्हायरस त्याचा डेटा हा एक्सएमएल फाईलमध्ये स्टोअर करते, त्याचा अॅक्सेस हा हॅकर्सला सहज मिळतो.
काय काळजी घ्यावी?
एकदा का हा व्हायरस तुमच्या फोनमध्ये आला तर त्याला बाहेर काढणं अवघड होऊन बसतं. त्यामुळे यापासून वाचायचं असेल तर खबरदारी घेणं हा सोपा उपाय आहे. सुरक्षेची खात्री असल्याशिवाय तुम्ही कोणतेही अॅप डाऊनलोड करु नका. अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याचा रिव्ह्यू वाचा. अॅप डाऊनलोड करताना तुम्ही कोणत्या गोष्टींना परवानगी देता याची खात्री करा.