लोकशाही सर्वात कठीण काळातून जात असून जनतेच्या प्रश्नांसाठी लढा द्या, सोनिया गांधींचं काँग्रेस नेत्यांना आवाहन
बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेली काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची ही बैठक अंत्यत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रविवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना जनतेसाठी, सार्वजनिक प्रश्नांसाठी लढा देण्याच्या सूचना केल्या. लोकशाही सर्वात कठीण काळातून जात असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि काँग्रेस प्रदेश प्रभारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी पक्षाच्या नेत्यांना आवाहन केलं.
बैठकीबाबत माहिती देताना काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करून म्हटलं की, सोनिया गांधी यांनी सर्वांना जनतेच्या प्रश्नावर लढा देण्यासाठी संघर्ष करण्याची आणि त्यांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. कारण आपली लोकशाही सर्वात कठीण अवस्थेतून जात आहे.
Meeting of AICC General Secretaries & Incharges presided over by Congress President, Smt. Sonia Gandhi began at 4 PM sharp.
Sonia ji exhorted everyone to wage a struggle for people’s issues & ameliorating their sufferings as our democracy is passing through most difficult times. — Randeep Singh Surjewala (@rssurjewala) October 18, 2020
बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेली काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची ही बैठक अंत्यत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. तसेच मध्य प्रदेशातही 28 विधानसभेच्या जागा तसेच इतर राज्यातही पोटनिवडणुका होत आहेत.
कॉंग्रेसने केंद्राकडून नवीन शेतीविषयक कायदे मंजूर करणे, उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित मुलीवरील कथित सामूहिक बलात्कार आणि मृत्यू, उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्था आणि देशाची अर्थव्यवस्था हे मुद्दे लावून धरले आहेत. नवीन कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसने देशव्यापी आंदोलनही सुरु केलं आहे.