Sita Amman Temple : अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर (Ayodhya Ram Mandir) बांधल्यानंतर आता श्रीलंकेमध्ये (Sri Lanka) माता सीतेचे भव्य मंदिर (Sita Amman Temple) उभारले जात आहे. या भव्य सीता मातेच्या मंदिराच्या अभिषेकासाठी अयोध्येच्या शरयू नदीचे पवित्र पाणी श्रीलंकेला पाठवले जाईल. भारत सरकारने त्याची प्रक्रिया सुरू केली आहे. श्रीलंकेतील 'सीता अम्मा मंदिर' अभिषेक सोहळा 19 मे रोजी होणार आहे. 


अयोध्येत श्रीराम वसले, श्रीलंकेत सीता माता 


अयोध्येतील भव्य राम मंदिर उभारल्यानंतर श्रीलंकेत सीतेचे मंदिर उभारले जाते आहे आणि भारत श्रीलंका संबंधही सुदृढ होण्यासाठी त्याचे निमित्त होऊ शकते. श्रीलंकेत भव्य सीता अम्मा मंदिराचा अभिषेक सोहळा 19 मे रोजी पार पडणार आहे. सीता मंदिराच्या अभिषेकासाठी रामाच्या अयोध्येतील शरयू नदीचे पाणी मागवण्यात आले आहे. आपल्या प्राणप्रिय पत्नीच्या मंदिरासाठी शरयूचे पाणी जाणार याचा आनंद प्रभू श्रीरामाला होणारच. 


शरयू नदीच्या पाण्याने होणार अभिषेक


उत्तर प्रदेश सरकारन शरयू नदीचे पाणी श्रीलंकेत नेण्यासाठी परवानगी दिली आहे.  15 मे रोजी श्रीलंका सीता माता मंदिर प्रशासनाचं एक पथक शरयू नदीतून जल नेण्यासाठी भारतात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. रावणाने सीता मातेला अशोक वाटिकेत कैद केले होते, तिथेच माता सीतेचे मंदिर बांधले जात आहे. या सोहळ्याला श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि पंतप्रधान दिनेश गुणवर्धने उपस्थित राहणार आहेत. 


रावणाने सीतामातेला कैद केले तिथेच मंदिर


अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. सीता अम्मा मंदिर श्रीलंकेतील नुवारा एलियाच्या डोंगरावर आहे. ज्याचा रामायणात उल्लेख आहे, ती हीच अशोक वाटिका आहे, असे मानले जाते. माता सीतेला रावणाने अशोक वाटिकेतच कैद केले होते. जेव्हा हनुमान माता सीतेचा शोध घेत होते तेव्हा ते प्रथम येथे पोहोचले. हनुमानजींचे पुरावे देखील सीता अम्मा मंदिराजवळ आहेत. त्यांच्या पावलांचे ठसे येथे आहेत. याच ठिकाणी सीता मातेचं मंदिर उभारण्यात आलं आहे.


परराष्ट्र धोरणात भारताची सॉफ्ट पॉवर


श्रीलंकेच्या प्रतिनिधी मंडळाने शरयू नदीच्या पाण्यासाठी भारत सरकारला अधिकृत विनंती केली आहे. शरयूचे पाणी श्रीलंकेला पाठवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारला व्यवस्था करायची आहे आणि उत्तर प्रदेश सरकारने काम सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. राम आणि रामाच्या माध्यमातून भारतासोबत जोडले जाणारे दक्षिण आशियातील देश म्हणजे परराष्ट्र धोरणात भारताच्या सॉफ्ट पॉवरचा स्वतंत्र अध्याय आहे. सध्या या सॉफ्ट पॉवरचा उपयोग भारताकडून यशस्वीपणे केला जातोय, हे सुध्दा लक्षात घेतले पाहिजे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


प्रभू श्रीरामाच्या भाळी सूर्यतिलकाची मोहोर, रामलल्लावर रामनवमीच्या दिवशी कसा होईल सूर्यकिरणांचा अभिषेक?