अयोध्या : आज रामनवमीच्या (Ram Navami) निमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, तर प्रभू श्रीरामांची (Ram Mandir) अयोध्यानगरीही (Ayodhya) राममय झाली आहे. देशासह जगभरातील रामभक्त अयोध्येत दाखल झाले आहेत. प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर साजरी होणारी ही पहिलीच रामनवमी सर्वच रामभक्तांसाठी खास असणार आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीत प्रभी श्री रामाचे मंदिर निर्माण झाल्यानंतर आज पहिलीच रामनमवी आहे. या पहिल्या रामनमवीच्या दिवशी अयोध्येत मोठ्या संख्येने रामभक्तं दर्शनासाठी दाखल झाले आहेत.


अयोध्येत रामभक्तांची मोठी गर्दी


अयोध्येतील शरयू नदी घाट, हनुमान  गडी आणि राम मंदिर परीसर भाविकांनी फुलून गेलेत. अयोध्येतील ही संभाव्य गर्दी लक्षात घेता अयोध्या शहरात अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. अयोध्या शहराबाहेरच सर्व वाहने थांबवून सर्व भाविकांना चालतच मंदिरात दर्शनासाठी जावं लागत आहे. तसेच भाविकांची गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने अतिरिक्त पोलिस तैनात केले आहेत. आज राम नमवीच्या दिवशी २५ लाखाहून अधीक भावीक राम मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेणार असल्याची माहीती प्रशासनाने दिली आहे.


यंदाची रामनवमी खास


आज रामनवमीची जगभरातल्या रामभक्तांना प्रतीक्षा आहे. 500 वर्षांनी प्रभू श्रीराम आपल्या जन्मभूमीत विराजमान झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी आहे. त्यामुळे मनी ध्यानी रामाचा जप करत अयोध्येमध्ये येण्यासाठी प्रत्येक रामभक्त आतुर आहेत. यंदाच्या रामनवमीचं सगळ्यात मोठं आकर्षण असेल रामलल्लाच्या मस्तकी होणारा सूर्यतिलक अर्थात सूर्य किरणांचा अभिषेक. 


प्रभू श्रीरामाच्या भाळी सूर्यतिलकाची मोहोर


रामनवमीच्या दिवशी रामलल्लाच्या भाळी सूर्यतिलकाची मोहोर उमटणार आहे. रामनवमीच्या दिवशी, मध्यान्ही, बरोबर दुपारी बारा वाजता, साधारणपणे चार मिनिटं रामलल्लाच्या मस्तकावर सूर्यकिरणांचा अभिषेक होणार आहे. रामलल्लाच्या कपाळी गोलाकार सूर्याभिषेक होणार असून याचा आकार 75 एमएम व्यास असेल. सूर्यकिरण अभिषेकासाठी राम मंदिर निर्माण करताना वैज्ञानिक अहोरात्र मेहनत घेत होते. रामलल्लावर रामनवमीच्या दिवशी सूर्यकिरणांचा अभिषेक  कसा होईल, ते जाणून घ्या.


रामलल्लावर सूर्यकिरणांचा अभिषेक कसा होईल?


राम मंदिर उभारताना रामलल्लावर सूर्यकिरण अभिषेक होण्यासाठी बांधकाम तज्ज्ञांनी विशेष रचना केली आहे. आजवर अनेकदा आपण कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात होणारा किरणोत्सव पाहिलाय आणि अनुभवलाय. मावळतीची किरणं मंदिराच्या पश्चिम दरवाजातून येत देवीच्या पायापासून मस्तकापर्यंत अभिषेक करतात. तसाच काहीसा अनुभव आज राममंदिरात येणार आहे. अयोध्येतल्या राम मंदिरातला किरणोत्सव त्यापेक्षा थोडासा वेगळा असेल. 


राम मंदिरात सूर्यअभिषेकासाठी खास रचना


अयोध्येच्या मंदिरात अंबाबाईच्या मंदिराप्रमाणे सूर्यकिरणे दरवाज्यातून नाहीतर ती घुमटातून येतील. रामजन्म म्हणजे ठीक मध्यान्हीची वेळ, त्यामुळे यावेळी सूर्य अगदी आपल्या डोक्यावर असतो.  त्यामुळे मंदिरात रामलल्लावर सूर्यकिरणे घुमटातून येतील. रामलल्ला विराजमान असलेल्या घुमटावर गवाक्षासारखी रचना करण्यात आली आहे आणि याच गवाक्षातून एका विशेष सिस्टिमच्या माध्यमातून मध्यान्हीची किरणं गाभाऱ्यात येत रामलल्लाचं तेज वाढवतील.


आता घुमटाच्या गवाक्षातून येणाऱ्या किरणांची दिशा अचूक ठेवण्यासाठी ऑप्टोमेकॅनिकल सिस्टिमचा आधार घेतला गेला आहे. या सिस्टिममध्ये अभिषेकासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतील दोन आरसे, एक पितळेचा पाईप आणि तीन लेन्सेस. यातली सगळ्यात मोठी लेन्स  मंदिराच्या छतावर बसवली गेली आहे. रामनवमीच्या दिवशी सूर्यकिरणं छतावरच्या रिफ्लेक्टवर पडतील. तिथून ही किरणं पहिल्या आरशावर परावर्तीत केली जातील आणि मग पितळेच्या पाईपमधल्या पुढच्या दोन लेन्समधून प्रवास करत ही किरणं पोहोचतील थेट गाभाऱ्यात रामलल्ला समोर बसवलेल्या दर्पणापर्यंत. हा आरसा रामलल्लापासून साठ अंशांच्या कोनात ठेवला गेला आहे. जेणेकरुन या किरणांचा अभिषेक थेट रामाच्या मस्तकी होऊ शकेल. रामलल्लावर होणाऱ्या सूर्यकिरणांच्या अभिषेकाचं थेट प्रक्षेपण होणार आहे. तर अयोध्येतल्या भाविकांना हा सोहळा पाहता यावा यासाठी  100 एलईडी स्क्रीन लावले जातील.