Sikkim Landslide : सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन, रस्ते बंद ; लष्कराकडून अडकलेल्या 3500 पर्यटकांची सुटका
Landslide in Sikkim : सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. लष्कराने भूस्खलनात अडकलेल्या 3500 पर्यटकांची सुखरुप सुटका केली आहे.
Sikkim Heavy Rain : सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिक्कीम भूस्खलन झाल्याने काही ठिकाणी रस्ते बंद पडले आहेत. यामुळे बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं असून बचाबकार्य सुरु आहे. लष्कराने आतापर्यंत अडकलेल्या तीन हजारहून अधिक पर्यटकांची सुटका केली आहे. या नागरिकांची सुखरूप सुटका आणि व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे.
सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन, रस्ते बंद
सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे उत्तर सिक्कीममधील अनेक भागात रस्ते बंद झाले आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. चुंगथांगमध्ये भागात अनेक पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, भारतीय लष्कराने शनिवारपर्यंत अडकलेल्या 3 हजार 500 पर्यटकांना सुखरूप बाहेर काढलं आहे.
भूस्खलनात अडकलेल्या 3500 पर्यटकांची सुखरुप सुटका
एएनआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, भारतीय लष्कराने शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत दोन हजार पर्यटकांची सुटका केली. त्यानंतर 1500 पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. उत्तर सिक्कीममधील लाचेन आणि लाचुंगसह अनेक भागात मुसळधार पावसामुळे लोक अडकले होते. जिल्हा प्रशासनाने अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी 19 बस आणि 70 छोटी वाहने तैनात केली आहेत. आतापर्यंत तीन बस आणि दोन अन्य वाहने 123 पर्यटकांना घेऊन राज्याची राजधानी गंगटोककडे रवाना झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Sikkim | The first bus with 19 men, 15 women and 4 children departed from the landslide hit Pegong in Mangan district, for the state capital Gangtok. A total of 72 tourists evacuated so far in two buses: Sikkim Police
— ANI (@ANI) June 17, 2023
(Photos: Sikkim Police) pic.twitter.com/YMxt9INUPF
प्रतिकूल हवामानाचा सामना करत पर्यटकांना वाचवण्यात यश
सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यात भूस्खलनामुळे आणि चुंगथांगजवळील पूल वाहून गेल्याने अडकलेल्या 3500 पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती संरक्षण प्रवक्त्यांनी दिली आहे. भारतीय लष्कर (Indian Army), त्रिशक्ती कॉर्प्स (Trishakti Corps), आणि बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनच्या (BRO - Border Roads Organisation) जवानांनी रात्रभर प्रतिकूल हवामानाचा सामना करत पर्यटकांना वाचवण्यासाठी तात्पुरते क्रॉसिंग तयार करण्यासाठी काम केले. पर्यटकांना नदी ओलांडण्यासाठी मदत करण्यात आली आणि त्यांना जेवण, तंबूत राहण्याची सुविधा आणि वैद्यकीय मदत देण्यात आली.
पूर्व भारतावर बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम
बिपरजॉय चक्रीवादळामुळे सिक्कीममध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. गुजरातला धडकलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम पूर्व भारतातील राज्यांवर होताना दिसत आहे. हवामान विभागाने या आधी वर्तवलेल्या अंदाजानुसार, चक्रीवादळ बिपरजॉय पूर्व भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला मदत करत आहे. त्यामुळे या भागात पावसाची शक्यता असल्याचं सांगितलं होतं. बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम देशभरातील वातावरणावर दिसून येत आहे. यामुळे गुजरात आणि राजस्थानसह पूर्व भारतातही पाऊस सुरु आहे.