Sidhu Moosewala Murder : बिश्नोई गँगशी संबंधीत सर्व गँगस्टर सिग्नल अॅपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात, पोलीस तपासातून उघड
काही इमर्जन्सी आली तर त्यासाठी खास इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केलं जायचं आणि त्यावर नवा कोड शेअर केला जायचा. त्या नव्या कोडच्या सहाय्याने बिश्नोई गॅंगशी संवाद साधला जायचा.
मुंबई: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी असलेल्या लॉरेन्स बिश्नोई गॅंगशी संबंधित गँगस्टर हे सिग्नल अॅपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये स्पष्ट झालं आहे. या लोकांनी इन्स्टाग्रामवर असंख्य फेक अकांऊट उघडले असल्याची माहितीही समोर आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनसार, लॉरेन्स बिश्नोई गॅंगशी संबंधित गोल्डी ब्रार, विक्रम ब्रार आणि इतर गँगस्टर हे सिग्नल या सोशल मीडिया अॅपच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्कात आहेत. गोल्डी ब्रार सध्या कॅनडामध्ये आहे तर विक्रम बराड हा ऑस्ट्रियामध्ये आहे.
ज्या शूटरसोबत चर्चा करायची असेल त्याला आधीच सिग्नल अॅपच्या माध्यमातून तशी सूचना दिली जायची. त्यामध्ये कोणत्या फेक इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्याच्याशी कम्युनिकेट केलं जाणार याची माहिती दिली जायची. यासाठी गोल्डी ब्रार आणि ग्रुप मेंबर्सकडे एक खास पासवर्ड आहे.
जेव्हा शूटर आणि ग्रुप मेंबर यांचा कोडवर्ड मॅच व्हायचा त्यावेळीच गोल्डी ब्रार पुढची बोलणी करायचा. जर काही इमर्जन्सी आली तर त्यासाठी खास इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केलं जायचं आणि त्यावर नवा कोड शेअर केला जायचा. त्या नव्या कोडच्या सहाय्याने बिश्नोई गॅंगशी संवाद साधला जायचा.
या सिग्नल अॅपच्या माध्यमातून लॉरेन्स बिश्नोई गॅंगमध्ये नव्या लोकांची भरती केली जायची. त्या माध्यमातूनच खंडणी गोळा करणे, खुनाच्या सुपारी घेणे आणि इतरही अनेक गोष्टी केल्या जायच्या. सौरव महाकाल या अॅपचा वापर करत होता. त्याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्या माध्यमातून मोठी माहिती उघड झाली आहे.
सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील सहाव्या शूटर्सची ओळख पटली
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येतील सहाव्या शूटर्सची ओळख पटली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे सीपी एचएस धालीवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. स्पेशल सेलची टीम मुसेवाला हत्येप्रकरणी कसून तपास करत आहे. मुसेवाला यांची हत्या अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली, असेही दालीवाल यांनी सांगितले.
धालीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसेवाला यांच्या हत्येतील आणखी एका शूटरची ओळख पटली आहे. विक्रम ब्रार असे या सहाव्या शूटर्सचे नाव आहे. यापूर्वी ज्या आठ शूटर्सची नावे समोर आली होती त्यापैकी चार जणांची भूमिका स्पष्ट झाली आहे. सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील संशयित सिद्धेश हिरामण कांबळे उर्फ महाकाळ याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. महाकाळ याची चौकशी केल्यानंत संतोष जाधव आणि नवनाथ सूर्यवंशी यांना साडेतीन लाख रूपये दिल्याचे समोर आले आहे. यात महाकाळ याला 50 हजार रुपये मिळाले. शूटर्सची व्यवस्था करण्याचे काम विक्रम ब्रार याने केल्याचे तपासात पुढे आले आहे.