Shravan 2023: नवविवाहिता असाल तर श्रावणात नक्की जा माहेरी; जाणून घ्या याचं कारण
धार्मिक दृष्टिकोनातून श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. हिंदू धर्मात अशी प्रथा आहे की, लग्नानंतर नववधू श्रावणाच्या पहिल्या आठवड्यात तिच्या माहेरी जाते आणि संपूर्ण श्रावण तिथेच राहते.
Shravan 2023: श्रावण अगदी काही दिवसांनर येऊन ठेपला आहे. हिंदू धर्मात श्रावण (Shravan 2023) मासाला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात शंकर आणि पार्वतीची पूजा करण्याला अधिक महत्त्व दिलं जातं. आषाढ अमावस्येनंतर यंदा तब्बल 2 महिन्यांचा श्रावण महिना असणार आहे. त्यामुळे या वर्षीच्या श्रावण महिन्यात चार किंवा पाच नव्हे, तर आठ सोमवार असणार आहेत. अधिक मासामुळे यंदा श्रावण महिन्याचा कालावधीही वाढला आहे. यावेळी श्रावण महिन्याची सुरुवात ही 18 जुलै रोजी होणार आहे, तर 14 सप्टेंबरला श्रावण महिन्याचा शेवट होईल. उत्तर भारतात श्रावण महिना आपल्या आधी सुरू होतो. उत्तर भारतात श्रावण महिना 4 जुलैपासून सुरू होणार असून ते 31 ऑगस्ट 2023 रोजी संपेल.
हिंदू धर्माशी निगडीत अनेक प्रथा, परंपरा आणि श्रद्धा आहेत, ज्या आजही पाळल्या जातात. श्रावण महिन्याशी संबंधित चालीरीती पाळल्या जातात. या महिन्यात अविवाहित मुली हाताला मेहंदी लावतात, सोमवारी उपवास करतात, तर विवाहित महिला मेकअप करतात आणि हाताला मेहंदी लावून हिरव्या बांगड्या घालतात.
यापैकी एक नियम आणि प्रथा म्हणजे श्रावण महिन्यात नवविवाहित वधू लग्नानंतर पहिल्या श्रावणात तिच्या माहेरच्या घरी जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, की लग्नानंतर नववधूने श्रावणात माहेरी का जावं? जाणून घेऊया.
श्रावणात नववधू आपल्या माहेरच्या घरी का जाते?
ज्योतिष शास्त्रानुसार लग्नानंतर श्रावणाच्या पहिल्या दिवशी नवविवाहित मुलींनी आपल्या माहेरी जाणं आवश्यक आहे. हे अत्यंत शुभ मानलं जातं. ही परंपरा शतकानुशतके पाळली जात आहे. या परंपरेचे पालन केल्याने सासू-सासरे यांच्याशी चांगले नाते राहते आणि सलोखा वाढतो, असं मानलं जातं.
नवविवाहित मुली श्रावणाला माहेरी जाण्यामागे हेही एक कारण असतं की, घराचं नशीब मुलीशी जोडलेलं असतं. अशा परिस्थितीत मुली जेव्हा श्रावण महिन्यात माहेरी येतात तेव्हा त्यांच्या घराचे नशीब उघडते. यामुळे कौटुंबिक जीवनात आनंद वाढतो आणि सुख-समृद्धी येते, त्यामुळे सासर आणि माहेरची परिस्थितीही चांगली राहते.
हिंदू धर्मात मुलींना घरासाठी खूप शुभ मानलं जातं आणि त्यांना घरची लक्ष्मी म्हटलं जातं. लग्नानंतर जेव्हा मुली सासरी जातात तेव्हा माहेरच्या घरी दुःखाचं वातावरण असतं. दुसरीकडे लग्नानंतर श्रावणात मुलगी माहेरी आल्यावर घरात पुन्हा आनंदाचं वातावरण असतं.
ज्योतिष शास्त्रानुसार लग्नानंतर पहिला श्रावण माहेरी घालवल्याने वैवाहिक जीवन सुखी होतं आणि पती-पत्नीमधील प्रेम वाढतं. घरात राहून या काळात नवविवाहित मुलीने भगवान शंकर आणि गौरीती पूजा करावी आणि व्रत ठेवावं.
हेही वाचा: