अयोध्या : शिवसेनेने राममंदिरासाठी एक कोटी दान देण्याची घोषणा केली होती. मात्र अजून यातील एक रुपयाही आला नसल्याचं राममंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे. मात्र 27 जुलैला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच राम मंदिरासाठी एक कोटी रुपये दान ट्रस्टकडे जमा केल्याची माहिती शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. 28 तारखेला हे पैसे जमा झाल्याची पोहोच आली असाही दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे राम मंदिर ट्रस्टला पैसे मिळाले की नाही, असा संभ्रम आता निर्माण झाला आहे.


सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मंदिर निर्मितीसाठी जो ट्रस्ट स्थापन झाला आहे त्याचे महंत नृत्य गोपाल दास अध्यक्ष आहेत. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, राममंदिर भूमिपूजनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सारे साधुसंत तयारीत आहेत. आता लवकरात लवकर मंदिर निर्माणाचे काम सुरू होईल.


ते म्हणाले की, एका महिन्याच्या आत प्रत्यक्ष काम सुरू होईल. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना बोलावलं नसल्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, सर्वांना बोलावलं जाईल. यावेळी शिवसेनेने एक कोटी दान देण्याची घोषणा केली होती त्याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले की, अजून काही माहिती नाही. आतापर्यंत एक रुपयाही आलेला नाही. मुरारी बापू देखील दान देणार होते पण अजून पैसे आले नाहीत. मात्र मंदिर निर्माणासाठी पैशांची कमी पडणार नाही, असंही ते म्हणाले.


या कार्यक्रमात शिवसेनेला बोलावलं नाही त्यावर ते म्हणाले की, अयोध्येत कुणाला आमंत्रणाची गरज पडत नाही. पण ज्याची भावना आहे. ज्याचं प्रेम आहे तो आपोआप येतो.


अयोध्या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी केली होती घोषणा
अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यादरम्यान केली होती. त्याचबरोबर त्यांनी योगी सरकारकडे अयोध्येत महाराष्ट्रातून येणाऱ्या रामभक्तांसाठी ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची विनंतीही केली होती. मला स्वप्नातही वाटलं नव्हत की मी मुख्यमंत्रीपदी विराजमान होईल, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नोव्हेंबरमध्ये मी पहिल्यांदा अयोध्येत आलो होतो आणि एक वर्षानंतर नोव्हेंबरमध्येच मुख्यमंत्री झालो, असा योगायोगही यावेळी त्यांनी सांगितला. मला कळालं की ट्रस्टचं एक बँक अकाऊंट तयार झालं आहे. त्यामुळे शिवसेना ट्रस्टच्यावतीनं १ कोटी रुपयांचा निधी आम्ही राम मंदिराच्या उभारणीसाठी देत आहोत. याचा ट्रस्टने स्विकार करावा, असं ठाकरे म्हणाले होते.


VIDEO | काय म्हणाले महंत नृत्य गोपाल दास 



भूमिपूजनाला उपस्थित मान्यवरांच्या यादीत लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची नावं नाहीत
अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांच्या यादीत काही बदल करण्यात आले आहे. सुरुवातीला तयार करण्यात आलेल्या यादीत 200 नावांचा समावेश होता. आता यादीतील 30 नावं कमी करण्यात आली आहेत. आता 170 जणांनी नवी यादी तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नावं आता पाहुण्यांच्या यादीत नाहीत. या दोन्ही नेत्यांना कार्यक्रमाला येण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे त्यांची नावं यादीतून हटवण्यात आली आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राम मंदिर आंदोलनाशी जोडलेले नेते उमा भारती आणि कल्याण सिंह यांची नावं पाहुण्यांच्या यादीत आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाशी जोडलेल्या 10 जणांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये भैयाजी जोशी, दत्तात्रय होसबोले, कृष्ण गोपाल, अनिल ओक, लखनौचे प्रचारक अनिल कुमार यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. याशिवाय विश्व हिंदू परिषदेचे अलोक कुमार, दिनेश चंद्र आणि मिलिंद यांच्यासह सहा जणांना निमंत्रण आहे. याआधी तयार करण्यात आलेल्या यादीत अयोध्येच्या पाच आमदारांना या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं होतं. मात्र आता केवळ अयोध्या शहराचे आमदार आणि महापौर यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. अयोध्येतील 52 संतांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे.


हे ही वाचा- 


Ram Mandir | राममंदिर भूमिपूजनाला योगी आदित्यनाथ वगळता एकाही मुख्यमंत्र्याला निमंत्रण नाही


राम मंदिर निर्माणासाठी महाराष्ट्रातून पहिली वीट कोणी पाठवली?


Ram Mandir | राममंदिराच्या भूमिपूजनाआधी अयोध्येतील पुजाऱ्यासह 16 पोलिसांना कोरोनाची लागण