ठाणे : राम मंदिर निर्माणचे भूमिपूजन पाच तारखेला होणार आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी यांनी बनवलेली चांदीची वीट सोशल मीडियावर वायरल झाली आहे. मात्र 1987 साली महाराष्ट्रातील एका शहरातून पहिली चांदीची वीट आयोध्या येथे पाठवण्यात आली होती. हे शहर मुंबई नसून ते शहर होते ठाणे.
ठाण्यातील त्याकाळचे शिवसेनेचे अध्यक्ष धर्मवीर आनंद दिघे यांनी ती विट पाठवली होती. आनंद दिघे कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जायचे. त्याकाळी शिवसेना देखील राम मंदिराच्या निर्माणासाठी अग्रेसर होती. बाळासाहेब ठाकरे यांचा उघड पाठिंबा राम मंदिर निर्माणासाठी होता. त्यामुळे कुणाच्याही ध्यानीमनी नसताना तसेच बाबरी मज्जिद पाडण्याच्या पाच वर्षे आधी आनंद दिघे यांनी त्याच जागी मंदिर निर्माण करण्यासाठी पहिली चांदीची वीट बनवून घेतली. ही वीट नवरात्रोत्सवात पूजनासाठी आणण्यात आली. टेंभी नाका येथे असलेल्या कनुभाई या दागिन्यांच्या व्यापाऱ्याकडून ही वीट आनंद दिघे यांनी बनवून घेतली होती. "ही वीट पूर्णतः चांदीची बनवलेली होती तर तिचे वजन सव्वा किलो इतके होते. त्यावर जय श्रीराम असे लिहिण्यात आले होते. आनंद दिघे यांनी खास ती बनवताना लक्ष घातले होते", असे कनुभाई रावल यांनी सांगितले. "मात्र लोकांचा उत्साह पाहून याच विटेची आणखीन एक प्रतिकृती बनविण्यात आली. या प्रतिकृती मध्ये चंदनाचे लाकूड वापरून त्यावर चांदीचा मुलामा देण्यात आला होता. खरी चांदीची वीट ही पूजा करून तार सेवकांच्या मार्फत अयोध्येला पाठवण्यात आली. तर त्या वितेची प्रतिकृती ठाण्यातील टेंभी नाका येथे सात दिवस ठेवण्यात आली होती", असेही कनुभाई यांनी सांगितले.
या विटेचे पूजन गजानन पट्टेकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी अनेक ठाणेकरांनी स्वतःच्या घरातील चांदी दान म्हणून दिली होती. तसेच काही ठाणेकरांनी पैशाच्या स्वरूपात देखील मदत केली होती. "टेंभी नाका येथे असलेल्या अनेक व्यापाऱ्यांनी या पूजनाच्या दिवशी हजेरी लावली होती. आमच्यासाठी दिघे साहेबांचा आदेश सर्वकाही होता. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन तो सोहळा पार पाडला. त्यावेळी दिघे साहेबांबरोबर तिथे उपस्थित प्रत्येकाचा उत्साह वेगळाच होता. नवरात्रोत्सवात हे पूजन करण्यात आले होते", असे त्यावेळी सोहळ्याला उपस्थित असलेले एक व्यापारी उत्तम सोळंखी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
तर आता शिवसेनेच्या विविध पदांवर असलेले पदाधिकारी त्यावेळी कार्यकर्ते म्हणून आनंद दिघे यांच्या सोबत होते. "आनंद दिघे यांनी सात दिवस टेंभी नाका येथे ती वीट दर्शनाला ठेवली होती. त्यामुळे रामभक्त रांगा लावून त्या विटेचे दर्शन घेण्यासाठी येत होते. त्यासोबत आनंद दिघे यांनी 51 फुटी नामाचे प्रतिकृती टेंभी नाका येथे उभारली होती" असे शिवसैनिक संजय रवळेकर यांनी सांगितले.
" आनंद दिघे हे निर्भीड होते. कट्टर हिंदुत्ववादी होते. त्यामुळे बाबरी पाडण्यासाठी देखील ते गेले होते. त्यामुळे टेम्भी नाका येथील आनंदाश्रमावर सीबीआयाने धाड देखील टाकली होती", असे आताचे शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार यांनी सांगितले.
आता 33 वर्षानंतर राम मंदिरचे निर्माण सुरू होणार आहे. त्यामुळे ज्याची मुहूर्तमेढ आनंद दिघे यांनी रोवली, ते कार्य पूर्ण होणार असल्याने तेव्हाच्या शिवसैनिकांनी आणि टेम्भी नाका येथील व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या :