कानपूर : सेल्फी घेणं वाईट नसलं, तरी विचित्र सेल्फी घेण्याच्या नादात दाखवलेला निष्काळजीपणा कसा जीवावर बेतू शकतो, याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. गंगा नदीत सेल्फी घेण्याच्या मोहात सहा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.


 
कानपुरात गंगा नदीत मजामस्ती करण्यासाठी सहा विद्यार्थी पाण्यात उतरले. याचवेळी त्यांनी सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या नादात एक जण बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी पुढे गेलेले इतर पाचजणही बुडाले. सहा जणांना बुडताना पाहून किनाऱ्यावर बसलेला युवक मकसूद अहमद त्यांच्या मदतीला गेला, मात्र तोही बुडाला. पोलिसांनी आतापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढले असून आणखी एकाचा
शोध सुरु आहे.

 
कानपुरात विनोबानगरमध्ये राहणारा सत्यम गुप्ता हा एलएलबीचा विद्यार्थी होता. सकाळपासून पडणारा पाऊस आणि आल्हाददायी वातावरणामुळे त्यांना गंगेत डुंबण्याचा मोह झाला. त्यामुळे भाऊ शिवमसह, शेजारचे रोहित, गोलू, संदीप गुप्ता आणि सचिन गुप्ता या मित्रांसह त्याने नदीवर जाण्याचा प्लॅन आखला.

 
सहा जणांच्या मृत्यूसाठी स्थानिकांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. घटनेची माहिती दिल्यानंतर दोन तासांनी पोलिस घटनास्थळी पोहचल्यामुळे युवक बुडाल्याचं म्हटलं जात आहे.