अलाहबाद : उत्तर प्रदेशातील अलाहाबाद शहरात ईदच्या खरेदीसाठी निघालेल्या दुचाकीस्वार पती-पत्नीला एका टेम्पोने चिरडलं. या अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला असून ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत.


 
स्थानिक प्रशासनाच्या कचरा उचलणाऱ्या टेम्पोने पती-पत्नीच्या दुचाकीला धडक दिल्याचं सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे. धडक दिल्यानंतर गाडीखाली चिरडल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर धडक देणाऱ्या कचरागाडीचा चालक गाडी रस्त्यावर सोडूनच घटनास्थळावरुन पसार झालाय.

 
अपघातात मृत्युमुखी पडलेले 50 वर्षीय रशिद अन्सारी अकाऊण्टंट जनरलच्या कार्यालयात अधिकारी होते. ऑफिसमधून घरी आल्यानंतर ईदच्या खरेदीसाठी नसीम बानोसह स्कूटीवरुन निघाले. घरापासून जवळच सुलेम सराय परिसरात गर्दीने गजबलेल्या रस्त्यावरच हा अपघात घडला.

 
या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरुन कचरागाडीची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी गाडीचा चालक आणि त्याच्या सहाय्यकावर गुन्हा दाखल केलाय. मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.