Azam Khan Convicted in Hate Speech Case : रामपूर (Rampur) भडकाऊ भाषणप्रकरणी (Hate Speech Case) समाजवादी पक्षाचे आमदार आझम खान (Azam Khan) यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. रामपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. आझम खान यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narednra Modi), उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि तत्कालीन डीएम यांना शिवीगाळ केल्याचा आरोप होता. याप्रकरणी त्यांना रामपूर एमपी-एमएलए न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी आझम खान यांच्या शिक्षेवर दुपारी साडेतीन वाजता सुनावणी होणार आहे. दरम्यान, सपा नेते आझम खानही न्यायालयात हजर राहण्याची शक्यता आहे. तक्रारदार आकाश सक्सेना यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. आता या प्रकरणातील शिक्षा दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनंतर सुनावण्यात येणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आझम खान यांच्यावर लावण्यात आलेल्या तिनही कलमांमध्ये कमाल शिक्षा तीन वर्षांची आहे. पण जर त्यांना दोन वर्षांहून एक दिवसही जास्त शिक्षा सुनावण्यात आली, तर मात्र त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द होईल. न्यायालयानं जर शिक्षा सुनावताना आझम खान यांना दोन वर्षांहून अधिक काळाची शिक्षा सुनावली, तर त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द होईल आणि समाजवादी पक्षासाठी हा सर्वात मोठा धक्का असेल. आझम खान हे समाजवादी पक्षाच्या संस्थापकांपैकी एक आहेत. 


2019 च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित प्रकरण


आझम खान यांच्याविरोधातील भडकाऊ भाषणाचं हे प्रकरण 2019 लोकसभा निवडणुकीच्या काळातील आहे. रामपूरच्या मिलक विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या भाषणादरम्यान आझम खान यांनी आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या होत्या. त्यांनी तत्कालीन डीएम, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावेळी भाजप नेते आकाश सक्सेना यांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली होती. गुरुवारी 27 ऑक्टोबर रोजी न्यायालयानं याच प्रकरणात सुनावणी केल्यानंतर आझम खान यांना दोषी ठरवण्यात आलं होतं.