तेज बहादूर यादव हे मोदींविरोधात अपक्ष निवडणूक लढवणार होते. परंतु उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सपाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
जानेवारी 2017 मध्ये तेज बहादूर यांनी बीएसएफच्या जवानांना दिले जाणारे जेवण हे निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमुळे तेज बहादूर चर्चेत आले. बीएसएफने त्यानंतर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत निलंबित केले होते. तेच तेज बहादूर युद्धाच्या मैदानातून आता निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
मी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला म्हणून मला निलंबित करण्यात आले. त्यामुळे सैन्य दलातील भ्रष्टाचार संपवणे आणि सैन्यदल मजबूत करणे हे माझे ध्येय असल्याचे तेजबहादूर यांनी सांगितल.
समाजवादी पक्षाने सुरुवातीला शालिनी यादव यांना वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. परंतु सपाने शेवटच्या क्षणी त्यांचा उमेदवार बदलला आहे. शालिनी या माजी काँग्रेस खासदार श्यामलाल यादव यांच्या सून आहेत.