बागेश्वर बाबांना साक्षी महाराजांचा फुल्ल सपोर्ट; म्हणाले, आई-वडिलांच्या सेवेत एक ठेवा, तीन मुलांना इथं पाठवा
चार मुलं जन्माला घाला, पण एक RSS ला द्या असं वक्तव्य बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूर इथं केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला खासदार साक्षी महाराज यांनी पाठिंबा दिला आहे.
Sakshi Maharaj : बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूर येथे भारतदुर्गा शक्तिस्थळाचा शिलान्यास समारंभात केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 'चार मुलं जन्माला घाला, पण एक RSS ला द्या', असं वक्तव्य बागेश्वर बाबांनी केलं आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर खासदार साक्षी महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी बागेश्वर सरकारच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे.
बागेश्वर सरकारचे धीरेंद्र शास्त्री यांनी हिंदूंना चार मुले जन्माला घालून एक मूल आरएसएसला देण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या या वक्तव्याला खासदार साक्षी महाराज यांनी पाठिंबा दिला आहे. लोकसंख्या सुरसासारखी वाढत असल्याचे साक्षी महाराज म्हणाले. लोकसंख्या नियंत्रणावर कठोर कायदे केले पाहिजेत असेही ते म्हणाले. हिंदू राष्ट्राचे पुरस्कर्ते धीरेंद्र शास्त्री यांनी जे खूप पूर्वी सांगितले होते, तेच मी आधीच सांगितले आहे. एक मूल संघात, एक मूल सैन्यात, एक मूल आई-वडिलांच्या सेवेसाठी आणि एक मूल संतांसाठी द्या असे साक्षी महारज म्हणाले. खासदार साक्षी महाराज यांनी त्यांच्या उन्नाव येथील निवासस्थानी हे वक्तव्य केले.
नेमकं काय म्हणाले होते धीरेंद्र कृष्ण शास्त्री?
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूर येथे भारतदुर्गा शक्तिस्थळाचा शिलान्यास समारंभात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामांचं कौतुक केलं. संघाचं कौतुक करत असताना बागेश्वर बाबांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या चर्चा होत आहे. 'चार मुलं जन्माला घाला, पण एक RSS द्या', असं वक्तव्य बागेश्वर बाबांनी केलं आहे. याचवेळी भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी देखील वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सततची युद्धे आणि संघर्ष करून छत्रपती शिवाजी महाराज थकले होते. त्यांनी थकून आपला मुकुट समर्थ रामदास स्वामींच्या पायाशी ठेवला आणि आता आपल्याला युद्ध करायचं नाही, तुम्हीच हा राज्यकारभार (राजपाट) सांभाळा, अशी विनंती केली. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले होते. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. आपल्या मनात जो संकल्प आला, भारतमाता दुर्गामाताच्या मंदिराचा संकल्प आहे. आम्ही मागे बसलो होतो तेव्हा एकजण सांगत होतं की, आपल्या मनात कल्पना आली की, लोकांना वाटत असेल की कल्पना आली. पण माझ्या मते भारतमातानेच हे निवडलं असेल की, असं व्हावं. आमचे गौरव पुन्हा स्थापन व्हावं असेही ते म्हणाले होते.




















