Russia Ukraine war : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा जगभरातील अनेक देशांवर परिणाम होत आहे. भारतावरही या युद्धाचा मोठा परिणाम होणार आहे. आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार असल्याचे सुतोवाच केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांनी केले आहे.  


रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळेच आगामी काळात देशात इंधनाच्या किमतीत वाढ होईल. इंधनाच्या किमती वाढल्यामुळे देशात महागाईसुद्धा वाढेल. परंतु, वाढत्या महागाई संदर्भात केंद्रीय मंत्रालय स्तरावर उपाययोजना केल्या जाणार, असल्याची माहिती मंत्री कराड यांनी दिली आहे.  
 
दरम्यान,  युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनाही भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री कराड यांनी सांगितले. ते म्हणाले, "युक्रेनमध्ये राज्यातील 1200 विद्यार्थी अडकले आहेत. परंतु, त्यांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोणाचे नातेवाईक युक्रेनमध्ये अडकले असतील तर त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन कराड यांनी केले आहे. 
 
 युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. सप्टेंबर 2014 नंतर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100 वर पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाल्यामुळे कच्चं तेल आणखी महाग होऊ शकतं, असं सांगितलं जात आहे.


कच्च्या तेलाच्या किमतींवर लक्ष ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या म्हणण्यानुसार, कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात. 2022 मध्ये कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 100 डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज खरा ठरला आहे, असं Goldman Sachs ने म्हटलं होतं. त्यावेळी, JP Morgan ने 2022 मध्ये प्रति बॅरल 125 डॉलर आणि 2023 मध्ये प्रति बॅरल 150 डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.


इंधनाचा पुरवठा नियंत्रणात : केंद्र 
दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलांच्या किंमती वाढत आहेत. परंतु, या जागतिक परिस्थितीवर आपण बारकाईने लक्ष ठेऊन असून तेलाच्या किंमती आणि त्याचा पुरवठा सध्या नियंत्रणात असल्याचं आश्वासन केंद्र सरकारने दिलं आहे. या संबंधी पेट्रोलियम मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपण जागतिक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. कच्च्या तेलाचा पुरवठ्यामध्ये अडचणी येणार नाही यासाठी आवश्यक ती पाऊलं उचलली जात आहेत. स्थिर किंमतीवर हा नागरिकांना हा पुरवठा कायम राहिल यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. 


भविष्यकाळात जर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यामध्ये अडचणी आल्या तर केंद्र सरकार आपल्या स्ट्रॅटेजिक रिझर्व्हमधील तेल बाजारात आणेल. त्यामुळे बाजारातील अस्थिरता होणार नाही. तसेच क्रुड ऑईलच्या किंमतीवरही नियंत्रण राहिल असं पेट्रोलियम मंत्रालयाने म्हटलं आहे. 


महत्वाच्या बातम्या


Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाचे दर सात वर्षातील उच्चांकावर; देशातही पेट्रोल-डिझेलच्या किमती वधारणार?


Crude Price @100 Dollar : देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा भडका उडणार? रशिया-युक्रेन तणावामुळं कच्च्या तेलाचे दर उच्चांकी पातळीवर