Petrol Diesel Prices To Shoot Up : देशवासीयांना महागाईचा मोठा फटका बसणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. युक्रेनवर रशियाचा हल्ला झाल्यामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. सप्टेंबर 2014 नंतर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100 वर पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरु झाल्यामुळे कच्चं तेल आणखी महाग होऊ शकतं, असं सांगितलं जात आहे.
कच्चं तेल 100 डॉलर पेक्षा महाग
कच्च्या तेलाच्या किमतींवर लक्ष ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या म्हणण्यानुसार, कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात. 2022 मध्ये कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 100 डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज खरा ठरला आहे, असं Goldman Sachs नं म्हटलं होतं. त्यावेळी, JP Morgan नंने 2022 मध्ये प्रति बॅरल 125 डॉलर आणि 2023 मध्ये प्रति बॅरल 150 डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात दोन महिन्यांपासून भाव कडाडले
कच्च्या तेलाच्या किमती पेटल्या आहेत. 2022 मध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत 25 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. 1 डिसेंबर 2021 रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 68.87 डॉलर होती. जे आता प्रति बॅरल 100 डॉलरच्या पातळीवर व्यवहार करत आहे. म्हणजेच, दीड महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती खालच्या पातळीपासून 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल नाही
दरम्यान, देशात पेट्रोल-डिझेलच्या दरांत गेल्या तीन महिन्यांपासून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 4 नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर, देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत असून 10 मार्चला निकाल लागणार आहेत. निवडणुकांमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ होऊनही सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करत नसल्याचं म्हटलं जात आहे. निवडणुकीनंतर, तोटा भरून काढण्यासाठी सरकारी तेल कंपन्या निश्चितपणे दर वाढवतील, असंही सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : अखेर युद्धाला तोंड फुटले! रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा
- Russia Ukraine War : रशियाने युक्रेनच्या डोन्बास प्रांतावरच हल्ला का केला? जाणून घ्या कारण...
- Russia Ukraine War : रशियाचे युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश, भारताचं संयुक्त राष्ट्रात शांततेचं आवाहन
- Share Market : रशिया-युक्रेन युद्धाचे शेअर बाजारात पडसाद; सेन्सेक्स 1458 तर निफ्टी 387 अंकांनी कोसळला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha