Jaipur News: जयपूर योजना भवनात कोट्यवधी रुपयांचे सोने सापडल्याने खळबळ उडाली आहे. आरबीआयकडून शुक्रवारी 2,000 च्या नोटांवर बंदीची बातमी येताच, संध्याकाळी उशिरा जयपूरमध्ये दोन कोटींहून अधिक रोकड सापडली आहे. एकीकडे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) कर्नाटकच्या शपथविधीवेळी नव्या सरकारचे अभिनंदन करत आहेत, त्याचवेळी राजस्थान सरकारचे बारा वाजले आहेत. 


विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेल्या रकमेत फक्त 2,000 आणि 500 ​​च्या नोटा आहेत. ही माहिती खुद्द राजस्थानचे मुख्य सचिव, पोलीस संचालक आणि पोलीस आयुक्तांनी संध्याकाळी उशिरा पत्रकार परिषदेत दिली.


अशा प्रकारे आले प्रकरण समोर


माहिती तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त संचालक महेश गुप्ता हे फायली डिजिटल करण्यासाठी योजना भवनातील कपाट उघडण्यासाठी गेले. या कपाटाची चावी सापडली नाही, म्हणून त्याचे कुलूप तोडण्यात आले. कुलूप तोडताच कपाटात 2000 रुपयांच्या नोटांचे बंडल दिसले. त्यासोबत कपाटात एक पिशवीही ठेवली होती, ज्यात सोनेही ठेवले होते. तत्काळ या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.


मुख्यमंत्र्यांना दिली माहिती


नोटांची एवढी मोठी खेप जप्त झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मात्र, त्याचा तपास सुरू असल्याचे पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी सांगितले आहे. संपूर्ण चौकशीनंतरच गोष्टी सांगितल्या जातील. या सर्व गोष्टी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या कानावर घातल्याचं त्यांनी मीडियाला सांगितलं. याप्रकरणी काही जणांना ताब्यातही घेण्यात आलं आहे. आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे.


2 कोटी रोख रक्कम, 1 किलो सोनं ताब्यात


सायंकाळी उशिरा जयपूरचे पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी सांगितले की, योजना भवनातील आयटी विभागाच्या तळघरात ठेवलेली दोन कपाटं उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात लॅपटॉप बॅग आणि ट्रॉलीसह सुटकेस आढळून आले. कपाटात अनेक नोटा मिळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.


मिळालेल्या माहितीनंतर लगेच पोलीस घटनास्थळी पोहोचले, पोलिसांनी एकूण 2 कोटी 31 लाख 49 हजारांची रक्कम जप्त केली. कपाटात रोख रकमेसह एक किलो सोन्याची बिस्किटं सापडल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली. योजना भवनातील कपाटात मोठ्या प्रमाणात 500 आणि 2000 च्या नोटा सापडल्या आहेत. याच्या तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून, ते पैसे कोणाचे होते याचा तपास करण्यात येणार आहे.


योजना भवनातील आयटी विभागाचे हे कपाट बरेच दिवस बंद होते, जे शुक्रवारी दुपारी 3-4 च्या सुमारास उघडण्यात आले. लॅपटॉप बॅग आणि ट्रॉली सुटकेसमधून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.


हेही वाचा:


RBI : 500, 1000 नंतर आता 2000 रुपयांच्या नोटेचा नंबर... गुलाबी रंगाची नोट साडे पाच वर्षातच 'आऊट', जाणून घ्या प्रवास