RBI on 2000 Note: रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकतीच एक मोठी घोषणा केली असून, 30 सप्टेंबरनंतर आता 2000 च्या नोटा या कायदेशीर अवैध्य असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता 500 हजार नंतर आता 2000 रुपयांच्या नोटांचाही नंबर लागला असून त्या चलनातून बाद होणार आहेत. केवळ साडे सहा वर्षाच्या आतच या नोटा बंद करण्याचा निर्णय आता आरबीआयने घेतला आहे. 


नोव्हेंबर 2016 मध्ये देशात नोटबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला आणि 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आरबीआयने 10, 20, 50, 100, आणि 500 रुपयांच्या  नव्या नोटेसोबत 2000 रुपयांची नवी नोट चलनात आणली. ही नोट गुलाबी रंगाची होती आणि त्यावर मंगळयानाचं चित्र होतं. 


सुरुवातील मोठ्या प्रमाणात चलनात


दोन हजारांची नोट सुरू केल्यानंतर सुरुवातीला ती मोठ्या प्रमाणात चलनात आणण्यात आली होती. त्यानंतर 2017-2018 साली या नोटा मोठ्या प्रमाणात चलनात आल्या होत्या. त्यावेळी या नोटांचा वापरही मोठ्या प्रमाणात होऊ लागला. आरबीआयच्या अहवालानुसार, 31 मार्च 2018 पर्यंत दोन हजारांचा 6.37 लाख कोटी नोटा चलनात होत्या. हे प्रमाण 37. 3 टक्के इतकं होतं. पण आता म्हणजे 31 मार्च 2023 रोजी, फक्त 3.62 टक्के नोटा या चलनात होत्या आणि हे प्रमाण 10.8 टक्के इतकं आहे. 


कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर अर्थव्यवस्था ही रुळावर येत असताना बाजारातून मात्र दोन हजारांच्या नोटा गायब होत असल्याचं दिसून येतं होतं. अनेक ठिकाणी दोन हजारांच्या नोटा स्वीकारल्या जात नव्हत्या. दोन हजारांच्या नोटा या बंद होणार आहेत, किंवा देशात पुन्हा एकदा नोटबंदी होणार आहे अशा अफवा उठायच्या. त्यामुळे ग्राहक असो वा व्यापारी, दोन हजारांच्या नोटा स्वीकारायचे नाहीत. 


नोटा चलनातून परत घेण्याची प्रक्रिया सुरू


या दरम्यान, ग्राहकांकडील दोन हजारांच्या नोटा या बँकांनी घ्याव्यात आणि आरबीआयकडे जमा कराव्यात असा आदेश आरबीआयने दिल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे लोकांकडील दोन हजारांच्या नोटा या हळूहळू परत घेतल्या जात होत्या, आणि बँकांनीही त्या ग्राहकांना द्यायचं बंद केल्या होत्या. त्यामुळे दोन हजारांच्या नोटांची ही अप्रत्यक्ष नोटबंदीच असल्याची चर्चा होती. 


दोन हजारांच्या नोटांची अडचण


सर्वसामान्य ग्राहकांना दोन हजारांच्या नोटाची मोठी अडचण व्हायची. कारण 500 नंतर थेट 2000 हजारांची नोट असल्यामुळे सुट्या पैशांची समस्या व्हायची. तर दुसरीकडे या मोठ्या नोटेमुळे काळ्या पैशामध्ये वाढ होत असल्याच्या चर्चा होत्या. 


मागील तीन वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापली नाही 


2016-17 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या 35429.91 कोटी नोटा छापल्या होत्या. यानंतर 2017-18 मध्ये अत्यंत कमी 1115.07 कोटी नोटा छापण्यात आल्या आणि त्यात आणखी कपात करुन 2018-19 मध्ये केवळ 466.90 कोटी नोटा छापण्यात आल्या. 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन आर्थिक वर्षांमध्ये 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही. 


2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या वाढली


दरम्यान, संसदेत 1 ऑगस्ट 2022 रोजी दिलेल्या उत्तरात म्हटलं होतं की NCRB डेटानुसार, 2016 ते 2020 दरम्यान देशात जप्त करण्यात आलेल्या 2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 वरुन 2,44,834 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार 2016 मध्ये देशात 2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 होती. 


 


आता चलनातून आऊट


दोन हजारांच्या नोटा बंद होणार, चलनातून बाद होणार ही चर्चा आता सत्यात उतरली आहे. केवळ साडे पाच वर्षातच ही नोट मागे घेण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. आता ही नोट 30 सप्टेंबरपर्यंतच वैध असणार असून त्यानंतर ही नोट चलनातून बाद होणार असल्याचं आरबीआयने जाहीर केलं आहे. 


या बातम्या वाचा: