Rajasthan CM Ashok Gehlot Read Old Budget : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Budget) सादर करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री गेहलोत अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विधानसभेत पोहोचले पण त्यावेळी जे झालं ते सर्वांच्याच कल्पनेपलिकडचं होतं. विधानसभेत जुना अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी चक्क गेल्या वर्षीचाच जुना अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. मात्र, मंत्री महेश जोशी यांनी त्यांना मध्येच रोखलं. या प्रकरानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. यानंतर सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. 


मुख्यमंत्री गेहलोत विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधी पक्षनेत्यांनी गदारोळ सुरु केला. यावेळी अशोक गेहलोत यांनी थोडा धीर धरा असंही सांगितलं. मात्र, मंत्री महेश जोशी म्हणाले की, "तुमच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. हे चुकीचं आहे."


गेहलोत यांनी मागील अर्थसंकल्पातील तीन ते चार योजना वाचल्या


मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेत विरोधी पक्ष खूपच आक्रमक झाला. त्यानंतर विधानसभेत मोठा गदारोळ झाला. असं सांगितलं जातंय की, "अशोक गेहलोत ज्यावेळी बजेट सादर करत होते, त्यावेळी त्यांनी मागील तीन ते चार योजनाही वाचल्या. यामध्ये नगरविकास आराखड्यातील गेल्यावर्षीच्या योजनांचाही समावेश होता. तेव्हा पाणीपुरवठा मंत्री महेश जोशी यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्या कानात सांगितलं. त्यानंतर ते सॉरी म्हणाले. मात्र यानंतर विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ सुरु केला."


विरोधकांच्या गदारोळात विधानसभा अध्यक्षांनी मी सभागृह सोडणार असल्याचं सांगितलं. मात्र हा गदारोळ पाहून राजस्थान विधानसभेचं कामकाज 30 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.


दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, "इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजना जाहीर केली आहे. याअंतर्गत शहरात राहणाऱ्या लोकांना 100 दिवसांचा रोजगार मिळणार आहे. यासाठी दरवर्षी 800 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत." यादरम्यान त्यांनी एक शेरही वाचला. त्याचवेळी पाणीपुरवठा मंत्र्यांनी त्यांना मध्येच रोखलं. कारण अर्थसंकल्पात मुख्यमंत्री ज्या घोषणा वाचून दाखवत होते, त्या घोषणा गेल्या वर्षी लागू झालेल्या होत्या.


केंद्रीय मंत्र्यांची गेहलोत यांच्यावर टीका






केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी याप्रकरणी एक ट्वीट केलं. ते म्हणाले की, "पेपर लीकनंतर राजस्थानचं बजेटही लीक. गहलोतजी एक कॉपी तर तुमच्याकडे ठेवायची, जुनं बजेट वाचायची वेळच आली नसती."