नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान, लाल किल्यावर झालेल्या हिंसेनंतर भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन राकेश टिकैत शेतकऱ्यांना भडकवत असल्याचा आरोप होत आहे. राकेश टिकैत व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत की, "आता सरकार निष्ठुर झालं आहे. त्यामुळे आंदोलनात झेंडा आणि काठ्या घेऊन या. शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा व्हिडीओ भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्वीट केला आहे.


व्हायरल व्हिडीओमध्ये काय म्हणाले टिकैत?


व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये राकेश टिकैत म्हणाले की, "ऐकत नाहीत, जास्तच निष्ठुर झालं आहे सरकार, झेंडा घेऊन या, काठ्याही आपल्यासोबत ठेवा. समजून जा साऱ्या गोष्टी. ठिक आहे? या तुम्ही, आता खूप झालं. तिरंग्यासोबत आपला झेंडाही आणा, या जमिनी वाचवायला. जमिन वाचत नाहीये." दरम्यान, हा व्हिडीओ कोणत्या दिवसाचा आहे, याची कोणतीच माहिती समोर आलेली नाही.


ज्या व्यक्तीचा हिंसेशी संबंध असल्याचं निष्पन्न होईल, त्याला आंदोलन सोडावं लागेल : टिकैत


ट्रॅक्टर रॅलीमधअये झालेल्या हिंसाचारानंतर आज सकाळी राकेश टिकैत म्हणाले की, "ज्याने झेंडा फडकावला ती व्यक्ती कोण होती? एका समुदायाला बदनाम करण्याचा प्रयत्न गेल्या दोन महिन्यांपासून सुरु आहे. काही लोकांना भडकवण्यात आलं आहे. त्यांना आजच इथून जावं लागेल. ज्या व्यक्तीचा हिंसाचाराशी संबंध असल्याचं स्पष्ट होईल, त्याला आंदोलन सोडावं लागेल आणि त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल."


पाहा व्हिडीओ : काठ्या आणि झेंडे घेऊन या; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा व्हिडीओ व्हायरल



प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर शेतकरी आंदोलकांचा गोंधळ


काल प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. रॅली दरम्यान, शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीमध्ये प्रवेश केला आणि लाल किल्ल्यावर गोंधळ घातला. आंदोलकांनी शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचाही प्रयत्न केला. एवढंच नाहीतर अनेक आंदोलकांनी पोलिसांना मारण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान, रात्री उशीरा सर्व आंदोलकांना लाल किल्ल्यावरुन बाहेर काढण्यात आलं.


आतापर्यंत 22 एफआयआर दाखल


हिंसेनंतर राजधानी दिल्लीमध्ये कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आलं. जणू काही छावणीचं रुप राजधानीला आल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीमध्ये पोलिसांसोबत सीआरपीएफच्या 15 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. काल झालेल्या हिंसाचारात जवळपास 86 पोलीस जखमी झाले होते. तसेच यादरम्यान, एका आंदोलक शेतकऱ्याचाही मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणानंतर 22 एफआयआर दाखल केल्या आहेत.