सोलापूर: मराठीच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधाची भूमिका घेतली असली तरी येत्या अधिवेशनात 'दूध का दूध, पाणी का पाणी' होईल असा इशारा राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी दिला. महाराष्ट्रात हिंदी सक्ती धोरण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले असल्याचा दावा संजय राठोड यांनी केला. आता अधिवेशन सुरू होणार आहे. त्यावेळी अनेक गोष्टी बाहेर येतील असा इशाराही त्यांनी दिला.

संजय राठोड म्हणाले की, "ठाकरे ही केंद्राच्या भूमिकेबाबत कायमच सोयीस्कर पद्धतीने भूमिका घेतात. जेव्हा फायद्याचं असेल तेव्हा बोलायचे आणि फायद्याचे नसेल तेव्हा गप्प बसायचे असे त्यांचे काम असते. आमच्या विदर्भाच्या भाषेत त्याला 'आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे ..' अशी म्हण आहे."

पावसाळी अधिवेशनात सगळं समोर येईल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या त्रिभाषी सूत्रावर योग्य ते स्पष्टीकरण दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळातच यावर अभ्यास समिती नेमल्याचं फडणवीसांनी सांगितलं. संजय राऊत यांनी फडणवीसांवर चुकीचा आरोप केला आहे. त्यामुळे आगामी पावसाळी अधिवेशनात सगळेच जनतेसमोर येईल असा टोलाही संजय राठोड यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.   हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चे काढण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चर्चेच्या आवाहनास प्रतिसाद दिल्यास चर्चेतूनच हा प्रश्न सुटेल असा विश्वास संजय राठोड यांनी व्यक्त केला.

तरुणीच्या आत्महत्येसंबंधी आरोप

या आधी काही दिवसांपूर्वी संजय राठोड यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. उद्धव ठाकरे यांच्याशी माझे आजही चांगले संबंध आहेत, त्यांचे आजही मला फोन येतात, असा खळबळजनक दावा त्यांनी केला होता. 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना संजय राठोड यांच्यावर एका तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आरोप झाले होते. भाजपने त्यावेळी त्यांच्यावर आरोप केले होते. त्याच प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे संजय राठोड नाराज झाले होते. त्यामुळे शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर संजय राठोड यांनी आपली नाराजी दर्शवत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणे पसंत केले. 

तरुणीच्या आत्महत्येचे आरोप झालेल्या संजय राठोड यांना महायुती सरकारमध्येही मंत्रिपद मिळालं.  त्यावरुनही त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली होती.  

ही बातमी वाचा: