नवी दिल्ली : कोरोना व्हायरस मागील 100 वर्षांतील सर्वात वाईट आरोग्य आणि आर्थिक संकट आहे, ज्यामुळं उत्पादन आणि नोकऱ्यांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. यामुळं जगभरात व्यवस्था, श्रम आणि कॅपिटल कोलमडलं आहे. त्यात देखील अर्थव्यवस्थेच्या वृद्धीलाच रिझर्व्ह बँकेचं प्राधान्य आहे. सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक पावलं उचलली जात आहेत, असं आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे.


आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज सातव्या एसबीआय बँकिग अँड इकॉनॉमिक्स कॉन्क्लेव्हला संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते. कोरोना महामारीमुळं यंदा हा कार्यक्रम व्हर्चुअल केला जात आहे. या कार्यक्रमात अनेक अर्थतज्ञांनी सहभाग घेतला आहे. दोन दिवस हा कार्यक्रम सुरु राहणार आहे. या कॉन्क्लेव्हची थीम 'बिझनेस आणि अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा प्रभाव' अशी आहे.

शक्तिकांत दास म्हणाले की, आरबीआयसाठी विकास ही पहिली प्राथमिकता आहे. वित्तीय स्थिरता देखील तेवढीच महत्वाची आहे. आपली अर्थव्यवस्था आणि आर्थिक प्रणाली किती मजबूत आहे, हे या केरोनाच्या काळात आपण दाखवून दिलं आहे. आपल्या आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवरील शतकातील हे सर्वात वाईट संकट आहे. नोकरीपासून दैनंदिन कामांवरही त्याचा मोठ्या प्रमाणात विपरित परिणाम झाला आहे, असं दास म्हणाले.

दास म्हणाले की, ''आरबीआयनं पंजाब आणि महाराष्ट्रात सहकारी बँकांचं समाधान करण्यासाठी चर्चा केली आहे. पैसा जमा करणं, बफर तयार करणं, ऋण प्रवाह आणि वित्तीय प्रणाली मजबूत करणे सर्वात महत्वाचं आहे.

शक्तिकांत दास म्हणाले की, फेब्रुवारी 2019 पासून आतापर्यंत आरबीआयनं 115 बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे. वृद्धी दरात झालेल्या घरणीतून सावरण्यासाठी तशा प्रकारची पावलं उचलण्यात आली आहेत. याबाबत मॉनिटरी पॉलिसी कमिटी रिझॉल्युशनमध्येही सांगण्यात आलं आहे. कोरोना संकटानं अनेकांचे प्राणही गेले आणि अनेकांच्या जीवनशैलीवर त्याचा परिणामही झाला, असंही ते म्हणाले.