रांची : रांचीच्या दिवाणी न्यायालयाने फेसबुकवर धार्मिक वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी एका विद्यार्थिनीला सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र जामीन देताना त्या मुलीला मुस्लिम धर्माच्या पवित्र कुराणाच्या पाच प्रति वाटण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे नवा वाद निर्माण झाला असून हिंदू संघटना नाराज झाल्या आहेत. दरम्यान सदर मुलीच्या  वकिलांनी 15 दिवसांत आदेशाचं पालन केलं जाईल असं आश्वासन दिलं आहे. हिंदू संघटना आणि स्थानिक भाजपा नेत्यांनी मात्र न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.


काही दिवसांपूर्वी रांचीच्या रिचा भारती नावाच्या मुलीने  तबरेज मॉब लिंचिंग प्रकरणासंदर्भात एक वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर केली होती. या प्रकरणी तिच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन तिला अटक करण्यात आले होते. यानंतर तिला कोर्टात दाखल करण्यात आले. यावेळी जिल्हा न्यायाधीश मनीष सिंह यांनी रिचाचा जामीन मंजूर केला. मात्र जामीन मंजूर करताना तिला कुराणच्या पाच कॉपी वाटण्याचे आदेश दिले. यातील एक कॉपी अंजुमन इस्‍लामिया कमिटीला आणि चार प्रति विविध शाळा आणि कॉलेजमध्ये वाटण्यास सांगितले आहे.

या निर्णयावर रिचाने  नाराजी व्यक्त केली आहे. यावर तिने म्हटले आहे की, अशा प्रकारच्या घटना याआधीही झाल्या आहेत. त्यावेळी आरोपींना मंदिरात जाऊन हनुमान चालीसा आणि गीता वाचण्यास का सांगितले नाही. तिने आपल्यासोबत अन्याय झाला असल्याचे म्हटले आहे.  हिंदू  जागरण मंचाने देखील या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.  फेसबुकवर हिंदू देवी देवतांच्या विरोधात देखील अशा पोस्ट करून अपमान केले जातात. मात्र अशा प्रकारचे काहीही वाद होत नाहीत. मात्र हे काहीतरी षडयंत्र आहे, असा आरोप हिंदू जागरण मंचाने केला आहे.

रिचा  कॉलेज विद्यार्थिनी असून पहिल्या वर्षात शिकत आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि नंतर अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर स्थानिकांमध्ये रोष पसरला होता. काही हिंदू संघटनांनी सुटकेसाठी निदर्शनही केलं होतं. मात्र नंतर दोन्ही समुदायांनी संमती दर्शवल्यानंतर न्यायालयाने रिचा भारतीला जामीन मंजूर केला.