नवी दिल्ली : भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'रोस्टर ड्युटी'त अनुपस्थित राहणाऱ्या मंत्र्यांना चांगलीच तंबी दिली आहे. राज्यसभा आणि लोकसभेत मंत्र्यांची दोन-दोन तासांची रोस्टर ड्युटी लागते. यावेळी मंत्र्यांनी हजर राहणे आवश्यक असते. मात्र अनेकदा मंत्री सभागृहात उपस्थित राहत नाहीत. यामुळे अनेकदा विरोधी पक्षातील नेते पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार करतात. मोदींनी अशा अनुपस्थित राहणाऱ्या मंत्र्यांना तंबी देत उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बैठकीत मोदींनी म्हटले आहे की, जे मंत्री रोस्टर ड्युटीत हजर राहत नाहीत त्यांची नावे मला द्या. मला सगळ्यांना सरळ करता येतं, असे मोदींनी म्हटलं आहे. याआधीही मोदींनी अधिवेशनात रोस्टर ड्युटीदरम्यान गैरहजर  राहणाऱ्या मंत्र्यांविषयी नाराजी व्यक्त केली होती.

संसदेत अधिवेशनादरम्यान अनेक खासदार अनुपस्थित राहतात. यावरूनही मोदींनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांनी अनुपस्थित राहणाऱ्या खासदारांना तंबी दिली होती. आता त्यांनी मंत्र्यांना रडारवर घेतले असून गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची नावं  त्यांच दिवशी संध्याकाळी माझ्याकडे देण्यात यावी. मला त्यांना सरळ करायला येतं, असं मोदींनी म्हटलं आहे.

या बैठकीत मोदींनी भाजपच्या खासदारांना देखील सूचना केल्या. मानवी संवेदनांशी जुळलेल्या मुद्द्यांवर आवाज उठवण्याचे आवाहन त्यांनी खासदारांना केले. तसेच आपल्या लोकसभा क्षेत्रातील महत्वाचे मुद्दे संसदेत उपस्थित करण्याबाबत देखील त्यांनी सूचना केल्या.

यावेळी भाजपचे बहुतांश खासदार पहिल्यांदा संसदेत आले आहेत. अशा खासदारांनी आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी मनापासून काम करण्याचे आवाहन देखील मोदींनी केले. सामाजिक विषयांवर मिशन मोडवर काम करण्याचे आवाहन देखील मोदींनी केले.

आपल्या क्षेत्राच्या विकासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करा. अधिकाऱ्यांची समन्वय ठेवून काम करण्याचे आवाहन देखील मोदींनी खासदारांना केले.