Ram Navami 2023 Live Updates : देशभरात रामनवमीचा उत्साह, शिर्डीत विविध कार्यक्रम; सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Ram Navami 2023 Live Updates : आज देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. राज्यासह देशभरातील रामनवमी संदर्भातील सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
LIVE
Background
Ram Navami 2023 : आज देशभरात राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. रामनवमीच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. प्रभू श्रीरामाचा जन्मदिवस रामनवमी म्हणून मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, त्रेतायुगातील रावणाचा अत्याचार संपवण्यासाठी भगवान विष्णू यांनी मृत्युलोकात श्रीरामाच्या रूपात अवतार घेतला. प्रभू श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी झाला. पुनर्वसु नक्षत्रात आणि कर्क राशीत राणी कौशल्या मातेच्या पोटी राजा दशरथाच्या घरी झाला. रामनवमी हा सण हिंदू धर्मात फार महत्त्वाचा आहे.
देशभरात रामनवमीचा उत्साह
आज देशभरात राम नवमीचा (Ram Navami) उत्साह पाहायला मिळत आहे. यावर्षीची राम नवमी धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. यानिमित्त अयोध्येत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. तसेच महाराष्ट्रात नागपूर, नाशिक, सातारा, शिर्डी, शेगाव, मुंबईसह राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी राम नवमी साजरी केली जात आहे. रामनवमीच्या उत्सवाच्या मुख्य दिवशी शिर्डीतील (Shirdi) साई मंदिरात साई नामाच्या जयघोषणानं परिसर दुमदुमून गेला आहे. आज पहाटे काकड आरतीपासूनच शिर्डीत दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. राज्यभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत.
शिर्डीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन
शिर्डीत (Shirdi) बुधवारपासूनच तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. 1911 साली सुरू झालेला रामनवमी उत्सव आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साईबाबा संस्थानच्या वतीने 29 ते 31 मार्च दरम्यान तीन दिवसीय रामनवमी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. साईबाबांची काकड आरती आणि पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडले. पुढील तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज (30 मार्च) म्हणजेच रामनवमीच्या मुख्य दिवशी साई मंदिर (Sai Baba Temple) रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. रामनवमी उत्सवासाठी दरवर्षी राज्यभरातून शेकडो पालख्या (Palkhi) घेऊन साईभक्त पायी शिर्डीत येतात. यंदाही भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत.
शिर्डीमध्ये रेलचेल
साईबाबा हयात असताना हा उत्सव मोठा उत्साहाने साजरा करत होते. आजही साईसंस्थान आणी गावकरी मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करतात. तीन दिवस अनेक कार्यक्रमाची रेलचेल शिर्डीत असते. पंढरपूरप्रमाणे शिर्डीलाही अनेक पायी पालख्या येतात. यंदाही राज्यभरातून शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. साईनामाचा गुजर करत खांद्यावर पालखी घेऊन नाचत गात अनेक भक्त शिर्डीत आल्याने रामनवमी उत्सवाला मोठी रंगत आली आहे.
श्री रामनवमी उत्सवानिमित्त शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात स्वाहाकार यागास प्रारंभ
दुसरीकडे दरवर्षीप्रमाणे यंदाही बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथल्या संत गजानन महाराज मंदिरात रामनवमी उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करुन होत आहे. गुढीपाडव्याला या उत्सवाची सुरुवात होऊन रामनवमीला मोठा उत्सव संत गजानन महाराज मंदिरात संपन्न होत आहे. श्री रामनवमी निमित्त श्रींच्या मंदिरात 28 मार्च रोजी आध्यात्म रामायण स्वाहाकार यागास प्रारंभ झाला असून आज रामनवमी उत्सवासाठी राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत.
Ram Navami: बदलापुरात राम नवमीच्या पालखीत हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन
अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर जवळ वांगणीत रामनवमी निमित्त हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन झालं. पवित्र रमजान महिन्यात आलेली रामनवमी हा दुग्धशर्करा योग्य असल्याचं सांगत मुस्लिम धर्मियांनीही भक्तिभावाने रामनवमीच्या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. वांगणी गावात 1826 सालापासून रामनवमी उत्सव साजरा होतोय. या उत्सवाचं यंदा तब्बल 197 वावं वर्ष आहे. वांगणी गावात हिंदू आणि मुस्लिम धर्मीय अनेक वर्षांपासून एकोप्याने राहतायत. रामनवमीच्या पालखी सोहळ्यातही मुस्लिम धर्मीय उत्साहाने सहभागी होतात. आजही वांगणी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. यानंतर मुस्लिम मोहल्ल्यासह संपूर्ण गावात ही पालखी फिरली. या पालखीत घोडे, रथ यासह वारकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. वांगणी गावातील ही पालखी हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतिक असल्याचं यावेळी गावातील हिंदू आणि मुस्लिम धर्मियांनी सांगितलं.
Solapur Ram Navami : सोलापुरात राम नवमीचा उत्साह
सोलापुरात श्रीराम नवमीचा उत्साह शिगेला,
शहरातील विविध मंडळांच्या निघाल्या राम नवमीनिमित्त मिरवणुका,
सोलापूर शहरात जवळपास 26 मंडळांच्या मिरवणुका निघालेल्या आहेत,
या मिरवणुकींमध्ये आकर्षक देखावे साकरण्यात आले आहेत,
तरुणाई देखील डीजेच्या तालावर थिरकत आहे.
Yavatmal Ram Navami: शोभायात्रा ठरली सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक वैभवात भर घालणारी
रामनवमीला यवतमाळ शहरात भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. भारतीय संस्कृती, लोकसभ्यता आणि विविध सामाजिक विषयांवर प्रबोधन करणारी ही अनोखी शोभायात्रा ठरली यवतमाळच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक वैभवात भर घालणारी.
रामनवमी शोभायात्रा आकर्षक आणि आदर्शवत ठरली आहे. जयहिंद चौकातील श्रीराम मंदिरातून श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून या शोभायात्रेला प्रारंभ झाला. यंदा नवीन दाक्षिणात्य शैलीच्या कलाकृतीत साकारण्यात आलेल्या आकर्षक अशा सुशोभित रथामध्ये हा रामदरबार विराजित करण्यात आला आहे. हा रामरथ रामभक्तांद्वारे शोभायात्रा मार्गावर हाताने ओढण्यात येणार असून महिला पुरुष आबालवृद्धांच्या या सर्वसमावेशक शोभायात्रेचे यंदाचे मुख्य आकर्षण केरळ येथील कलावंतांचा समूह असून. केरळ ड्रम बीट्स म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध चंदा मलम वाद्य आणि त्यावरील अप्रतिम कलाविष्कार लक्ष वेधून घेणारे ठरले. तसेचडोळे व चेहऱ्याचे भावपूर्ण हावभाव सादर करणारे 'कथकली' नृत्य देखील सादर करण्यात येत आहे. शोभायात्रेत प्रभू श्रीरामांचे प्रिय भक्त हनुमानाची 10 फूट उंच महाबली रूपातली वेशभूषा करून ढोल ताश्यावर थिरकणारे कलावंत हे देखील आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. त्यांच्या अवतीभवती पुलिकाली हा प्रसिद्ध असा वाघनृत्य प्रकार कलावंत सादर केला आहे. यासोबतच पांढरकवडा येथील पारंपारिक आदिवासी दंडार नृत्य, दारव्हा तालुक्यातील शंभर जणांचे लक्षवेधी भजनी मंडळ, कोलाम पोटांवरील डफ वाजविणारे 20 जणांचे पथक, विविध रामायणकालीन चलचित्र देखावे तसेच सामाजिक प्रबोधन करणाऱ्या आणि भारतीय संस्कृतीची झलक दर्शविणाऱ्या 70 हून अधिक झांक्या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या.
Hingoli Ram Navami : वसमतमध्ये राम नवमी निमित्त शोभा यात्रा, हजारो भक्तांचा सहभाग
आज श्रीराम नवमीचा उत्साह देशभरात पाहायला मिळतोय, त्याच पद्धतीने हिंगोलीच्या वसमत शहरातसुद्धा हाच उत्साह कायम दिसला आहे. राम भक्तांच्या वतीने हिंगोली शहरातील प्रमुख रस्त्यावरून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेमध्ये राम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांची वेशभूषा केलेले युवकसुद्धा पाहायला मिळाले. तर राम हनुमान यांच्या मूर्तीसुद्धा या शोभायात्रेमध्ये दिसून आल्या. या शोभायात्रेत हजारो राम भक्तांनी सहभाग घेतला होता.
Nagpur Ram Navami : नागपूरातील रामनगर येथील राम मंदिरातून थोड्याच वेळात प्रभू श्रीराम यांच्या शोभा यात्रेला सुरुवात होणार
नागपूरातील रामनगर येथील राम मंदिरातून थोड्या वेळात प्रभू श्रीराम यांच्या शोभा यात्रेला सुरुवात होणार आहे....
या शोभा यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरुवातीच्या काही वेळ उपस्थित राहणार आहे...
राम मंदिरातून छोटी पालखी खांद्यावर वाहत फडणवीस आणि इतर पाहुणे मंदिराच्या बाहेर आणतील...
त्यानंतर मंदिराच्या समोरून शोभा यात्रेला सुरुवात होईल...
पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणारी शोभायात्रा नागपूरातील मध्य आणि पूर्व नागपूरातून फिरते...
तर राम नगरातील राम मंदिरातून निघणारी शोभायात्रा पश्चिम नागपूरातून फिरते...