अयोध्या :  संकटाच्या चक्रव्युहातून रामजन्मभूमी मुक्त झाली, असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडलं. त्यानंतर संबोधित करताना ते म्हणाले की,  आता रामलल्लासाठी एका भव्य मंदिराचं निर्माण होईल. तुटणं आणि पुन्हा उभं राहणं यातून रामजन्मभूमी मुक्त झाली आहे. राम मंदिरासाठी अनेक वर्षांसाठी अनेक पिढ्यांनी प्रयत्न केला. आजचा दिवस त्याच संकल्प आणि त्यागाचं प्रतीक आहे, असं पंतप्रधान म्हणाले.


ते म्हणाले की,  श्रीराम आमच्या मनात आहेत. कोणतंही काम करायचं असेल तर प्रेरणा म्हणून त्यांच्याकडेच आपण पाहतो. हे मंदिर सामूहिक शक्तीचं प्रतीक बनेल. या ठिकाणी येणाऱ्यांना प्रेरणा देईल. या मंदिरामुळे या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात संधी निर्माण होईल. संपूर्ण जगातून लोकं या ठिकाणी दर्शनासाठी येतील. राम मंदिराची प्रक्रिया  राष्ट्राला जोडण्याची प्रक्रिया आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.

राम मंदिरासाठी झालेल्या आंदोलनात समर्पण, त्याग, संघर्ष, संकल्प होता. ज्याच्या त्याग, बलिदान आणि संघर्षाने आज हे स्वप्न साकार होत आहे, त्या सगळ्यांना मी नमन करतो, वंदन करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाल्याचा अभिमान आहे. शरयू नदीच्या काठावर सुवर्ण इतिहास लिहिला गेलाय. आज श्रीरामाचा जयघोष केवळ सिया-रामाच्या भूमीतच नाही तर संपूर्ण जगभरात घुमत आहे. सर्व देशावासियांना, जगभरातील राम भक्तांना आजच्या आनंदाच्या क्षणी कोटी कोटी शुभेच्छा, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

प्रभू श्रीरामाचा संदेश जगात आपली जबाबदारी
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, राम मंदिराकडून आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा मिळते. अनेक देशातील लोक प्रभू श्रीरामाला मानतात. जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असेल्या इंडोनेशियात रामायण पूज्यनीय आहे. कंबोडिया, मलेशिया, थायलंड, इराण आणि चीनमध्ये राम कथांची माहिती मिळेल. नेपाळ आणि श्रीलंकेचाही संबंध जोडलेला आहे. अनेक देशांमधील लोकांना राम मंदिराचं काम सुरू झाल्याबद्दल आनंद होत असेल. प्रभू श्रीराम हे सर्वांमध्ये आहेत. ते सर्वांचे आहेत. राम मंदिर अनंक काळापर्यंत मानवाला प्रेरणा देईल. प्रभू श्रीरामाचा संदेश संपूर्ण जागापर्यंत कसा निरंतर पोहोचेल हे आपल्या वर्तमान आणि भावी पिढ्यांची जबाबदारी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

भारताची अध्यात्मिकता हा जगासाठी प्रेरणेचा विषय
भारताची अध्यात्मिकता हा जगासाठी प्रेरणेचा विषय असल्याचं मोदी म्हणाले. ते म्हणाले की, आज देशातील नागरिकांच्या सहकार्यानं हे काम पूर्ण होत आहे. प्रभू श्रीरामाचं मंदिर म्हणजे एकजुटीचं प्रतीक आहे. श्रीराम गेल्या अनेक वर्षांपासून भारताचे स्तंभ बनले आहेत. श्रीरामाचं नाव असलेल्या शिळा देशातील अनेक भागांतून आल्या त्या एक ऊर्जा निर्माण करत आहेत. भारताची अध्यात्मिकता हा जगासाठी प्रेरणेचा विषय आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. कोरोनामुळं हा कार्यक्रम काही मर्यादांचं पालन करुन होत आहे. प्रभू श्रीराम यांच्या कार्यक्रमासाठी मर्यादांचं पालन करून झालं पाहिजे तसंच देशातील नागरिकांनी केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वांनी एकमेकांच्या भावनांचा आदर केला होता. या मंदिरासोबत नवा इतिहास रचला जात नाही तर इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे, असं मोदी यावेळी म्हणाले,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संबोधन सुरु, "सियावर रामचंद्र की..." जयघोष करत भाषणाला सुरुवात केली. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरावर आधारित नव्या टपाल तिकिटाचं अनावरण करण्यात आलं. तब्बल पाच लाख टपाल तिकिट छापण्यात येणार आहेत. आज संपूर्ण भारत राममय आणि मन दीपमय झाला आहे, एवढ्या वर्षांची प्रतीक्षा आज पूर्ण झाली, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

ज्याप्रमाणे मावळे छत्रपती शिवरायाच्या स्वराज्याचे संरक्षक बनले, तसंच देशातील अनेक लोकांच्या सहयोगाने राममंदिर निर्माणाचं हे पुण्यकार्य पूर्ण झालं, असं ते म्हणाले.

एक संकल्प केला होता, तो संकल्प आज पूर्ण झाला - मोहन भागवत 

हा आनंदाचा क्षण आहे, एक संकल्प केला होता, तो संकल्प आज पूर्ण झाला आहे, याचा आनंद आहे. इथं मंदिर बनणार आहे, मात्र आपल्याला आपल्या मनात मंदिराचं निर्माण करावं लागणार आहे. सर्वांना आपलं मानणारा धर्म आपल्याला उभा करायचा आहे. या मंदिराच्या पूर्ण होण्याआधी आपल्याला आपलं मनमंदिर उभं करायचं आहे, असं  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. आज अनेक लोकं इथं येऊ इच्छित होते. मात्र ते येऊ शकत नाहीत. आडवाणीजी देखील हा सोहळा पाहत आहेत. आत्मनिर्भर बनण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता होती त्याची सुरुवात आज झाली आहे. या आनंदाच्या क्षणी मी सर्वांचं अभिनंदन करतो, असं मोहन भागवत म्हणाले.

गेल्या 30 वर्षांच्या कठीण संघर्षाचं फळ आज मिळालं आहे. एवढ्या वर्षांचा संघर्ष कधीही विसरता येणार नाही. आज सर्वांच्या आनंदाचा क्षण आहे. देशातील सर्वांमध्ये प्रभू श्रीराम आहेत. राम मंदिराच्या उभारणीचं काम सर्वांना वाटून देण्यात आले आहे. परंतु आपल्याला आपल्या मनात अयोध्या सजवायची आहे. या ठिकाणी जसं मंदिर बनेल तसं मनातील अयोध्या बनायला हवी. हे मंदिर उभं राहण्यापूर्वी मनातील मंदिर उभं राहायला पाहिजे, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते राममंदिराचं भूमिपूजन

अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडलं. त्याआधी पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते मुख्य पूजा पार पडली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राममंदिर ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास हे उपस्थित होते.

बरोबर 12 वाजून 44 मिनिटे आठ सकंदांपासून 12 वाजून 44 मिनिटे आणि 40 सेकंद हा 32 सेकंदाच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते  भूमिपूजन पार पडलं.  सोशल डिस्टन्सिगचं पालन करत मुख्य पूजा त्याआधी पार पडली.  पायाभरणीसाठी पाया खोदण्यासाठी चांदीचं फावडं वापरलं गेलं तर चांदीची वीट यावेळी ठेवण्यात आली. त्याआधी पंतप्रधानांनी पारिजातकाचं वृक्षारोपण केलं. तर हनुमानगढीत त्याआधी त्यांनी पूजा केली. पंतप्रधानांनी हनुमानगढीत चांदीचा मुकुट अर्पण केला. अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मंत्रोच्चाराच्या गजरात पूजाविधी आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.

हे ही वाचा- 


Ram Mandir | राममंदिर भूमिपूजनाला योगी आदित्यनाथ वगळता एकाही मुख्यमंत्र्याला निमंत्रण नाही


राम मंदिर निर्माणासाठी महाराष्ट्रातून पहिली वीट कोणी पाठवली? 


भूमिपूजनाला उपस्थित मान्यवरांच्या यादीत लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची नावं नाहीत


Ram Mandir | राममंदिराच्या भूमिपूजनाआधी अयोध्येतील पुजाऱ्यासह 16 पोलिसांना कोरोनाची लागण