(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rakshabandhan 2021 : रक्षाबंधनाचा देशभर उत्साह, पंतप्रधान मोदींसह दिग्गजांकडून शुभेच्छा
Rakshabandhan 2021 : देशभरात रक्षाबंधनाचा सण आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. रक्षाबंधनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Rakshabandhan 2021 : श्रावण महिन्याचे वेध लागतात आणि श्रावण महिना सुरु झाला की, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचे वेध लागतात. देशभरात रक्षाबंधनाचा सण आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. हा सण म्हणजे, बहिण-भावाच्या अतुट नात्याचा सण. बहीण आपल्या भावाच्या दिर्घायुष्यासाठी भावाच्या हातावर राखी बांधते. तसेच आयुष्यभर आपलं रक्षण करावं, असं वचन बहिण भावाकडून घेते. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. यंदा पौर्णिमा 21 ऑगस्टच्या संध्याकाळपासून सुरु होणार आहे. तर 22 ऑगस्ट रोजी सूर्योदयापर्यंत पौर्णिमा असणार आहे. त्यामुळे 22 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरा करण्यात येत आहे.
रक्षाबंधनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व देशवासियांना रक्षाबंधनाच्या पावन पर्वाच्या खूप शुभेच्छा, असं ट्वीट मोदी यांनी केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सभी देशवासियों को रक्षाबंधन के पावन पर्व पर ढेरों शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) August 22, 2021
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी देखील रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भाऊ-बहिणीचे अतूट नाते अधिक दृढ करणारा, परस्पर स्नेहबंध वृद्धिंगत करणारा #रक्षाबंधन सण सर्वत्र चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करो ही सदिच्छा! असेच दृढ नाते कोळी बांधवांचे समुद्र आणि निसर्गाशी असते. आनंदमयी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, असं पवारांनी म्हटलं आहे.
भाऊ-बहिणीचे अतूट नाते अधिक दृढ करणारा, परस्पर स्नेहबंध वृद्धिंगत करणारा #रक्षाबंधन सण सर्वत्र चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करो ही सदिच्छा! असेच दृढ नाते कोळी बांधवांचे समुद्र आणि निसर्गाशी असते. आनंदमयी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! pic.twitter.com/xAAKtIwL5Y
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 22, 2021
रक्षाबंधनाच्या सणामुळे घराघरात आनंद, चैतन्य येईल : उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भाऊ-बहिणीचं अतूट नातं रक्षाबंधनाच्या धाग्यांनी अधिक घट्ट करणारा हा सण आपल्या सर्वांच्या घरात आनंद, चैतन्य, उत्साह घेऊन घेईल. रक्षाबंधनाचा सण समाजातील समस्त माता-भगिनींबद्दलचा मान-सन्मान, आदर वाढवणारा असेल. भाऊ-बहिणीचं पवित्र नातं साजरं करीत असताना समाजातील स्त्री-पुरुष समानतेची भावना या सणामुळे अधिक दृढ होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. रक्षाबंधनाचा हा सण भावांनी बहिणीच्या रक्षणाचा संकल्प करण्याचा, बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेण्याचा असला तरी, आज कोरोना संकटकाळात आपल्या अनेक महिला डॉक्टर भगिनी, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, अंगणवाडी ताई, आशा ताई, महिला पोलिस, इतर महिला कर्मचारी असा मोठा भगिनीवर्ग जीवाची जोखीम पत्करुन समाजातील इतर भावांचं कोरोनापासून रक्षण करण्यासाठी लढत आहे. या समस्त भगिनीशक्तीच्या शौर्य, त्याग, समर्पणाबद्दल आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी कृतज्ञ राहण्याची गरज आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील समस्त भगिनीशक्तीचा गौरव केला आहे. सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.