Rajasthan School Building Collapse: मोठी बातमी : शाळेचं छत कोसळून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू, राजस्थानातील भीषण दुर्घटना
Rajasthan School Building Collapse : राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. शाळेचे छत कोसळून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

Rajasthan School Building Collapse: राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात शुक्रवार (दि. 25 जुलै) रोजी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. मनोहरथाना ब्लॉकमधील पिपलोदी गावात असलेल्या सरकारी उच्च प्राथमिक विद्यालयाची छत अचानक कोसळले आणि त्यानंतर शाळेची भिंत देखील पडली. या दुर्घटनेत आतापर्यंत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अनेक विद्यार्थी अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी या दुर्घटनेत तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून बचाव आणि मदतकार्य वेगाने पार पाडण्याचे तसेच जखमी विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. झालावाडचे पोलीस अधीक्षक अमित कुमार यांनी सांगितले की, शाळेचे छत कोसळून 3 ते 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच झालावाडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक अमित कुमार बुडानिया घटनास्थळी रवाना झाले आहेत.
प्रशासनाकडून बचावकार्य सुरु
सध्या जेसीबी मशिनच्या सहाय्याने ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. जखमी विद्यार्थ्यांना मनोहरथाना येथील आरोग्य केंद्रात (CSC) दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेले स्थानिक ग्रामस्थ देखील प्रशासनासोबत मिळून बचावकार्यात मदत करत आहेत.
VIDEO | Jhalawar, Rajasthan: Roof of Piplodi Primary School collapses, several children feared trapped. Rescue operations underway.#RajasthanNews #Jhalawar
— Press Trust of India (@PTI_News) July 25, 2025
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/K0STKQwP0A
60 हून अधिक विद्यार्थी अडकल्याची भीती
अपघाताच्या वेळी शाळेमध्ये अनेक विद्यार्थी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, छत अचानक कोसळली आणि त्याखाली सुमारे 60 हून अधिक विद्यार्थी अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भीषण घटनेची तीव्रता लक्षात घेता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य अधिक वेगात सुरू केले आहे.
अपघाताचे संभाव्य कारण काय?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या इमारतीचं छत पूर्णतः जीर्ण झालेलं होतं, त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, मुसळधार पावसामुळे भिंतींमध्ये आर्द्रता निर्माण होऊन भिंती कमकुवत झाल्या, असे देखील स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.
अशोक गेहलोत यांची प्रतिक्रिया
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले आहे की, “झालावाडच्या मनोहरथाना येथील एका शाळेची इमारत कोसळल्याने अनेक विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाल्याची दुःखद माहिती मिळाली आहे. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की, जीवितहानी कमी व्हावी आणि जखमींना लवकर बरे वाटावे.” असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा























