आगामी 12 वर्षातील रेल्वेच्या योग्य नियोजनासाठी जवळपास 50 लाख कोटी रुपयांची रेल्वे मंत्रालयाला गरज आहे. इतकी मोठी रक्कम सरकारला जमा करणे अवघड आहे. त्यामुळं रेल्वेतील काही सेवांचे आउटसोर्सिंग करण्यात येणार असल्याची माहिती, राज्यसभेतील एका प्रश्नाचे उत्तर देताना रेल्वेमंत्री गोयल यांनी दिली.
काय म्हणाले केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल
"आमचा उद्देश हा भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचा नसून प्रवाश्यांना चांगल्या सुविधा देण्याचा आहे. भारतीय रेल्वे ही भारतातील नागरिकांची संपत्ती आहे आणि कायम राहील". प्रवाशांना रेल्वे आणि रेल्वे स्थानकांवर चांगल्या सुविधा देण्यासाठी आउटसोर्स करण्यात येणार आहे. यामुळं सध्या रेल्वे कर्मचाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या कोणत्याही सेवेत खंड होणार नाही. तर, बिहारमधील रेल्वे प्रकल्पांच्या प्रगतीशी संबंधित पूरक प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे राज्यमंत्री अंगडी सुरेश म्हणाले की, राज्यात सध्या 55 रेल्वे प्रकल्प सुरू आहेत. चालू आर्थिक वर्षात बिहारच्या रेल्वे प्रकल्पांसाठी 4036 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
दरम्यान, एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन या 2 सरकारी कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत विकण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली होती. सीतारामन यांनी म्हटले आहे की, या वर्षाअखेरपर्यंत या दोन्ही कंपन्यांची विक्री प्रक्रिया पूर्ण व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, त्यानंतर पुढील वर्षात या कंपन्यांची विक्री होईल. या दोन्ही कंपन्यांच्या विक्रीमधून सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा फायदा होईल, अशी आशा सीतारामन यांनी व्यक्त केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. सध्या एअर इंडिया खरेदी करण्यामध्ये गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह आहे. गेल्या वर्षी कमी प्रतिसाद मिळाल्यानंतर गुंतवणूकदारांकडून तोट्यात असलेल्या एअर इंडियाची विक्री थांबवावी लागली होती. मात्र, पुढील वर्षी या दोन्ही कंपन्यांची विक्री होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या :
परळी-वैद्यनाथ देवस्थानचा रेल्वेच्या राष्ट्रीय तीर्थस्थळांच्या यादीत समावेश
आईन्स्टाईनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, पियुष गोयल यांचं विधान, सोशल मीडियावर खिल्ली
Piyush Goyal | गुरुत्वाकर्षणाचा शोध आईनस्टाईनने लावला, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचं अजब विधान | ABP Majha