नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात होऊ घातलेल्या महाविकासआघाडीवर टीका केली आहे. गडकरी म्हणाले की, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष जी आघाडी बनवू पाहात आहेत, ती एक संधीसाधू आघाडी आहे. हे तीन पक्ष मिळून महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ शकत नाहीत.


नितीन गडकरी म्हणाले की, ही आघाडी कोणत्याही सिद्धांतांच्या, विचारांच्या जोरावर बनलेली नाही. शिवसेनेच्या विचारांशी काँग्रेस कधी सहमत नव्हती आणि नसेल. त्याचबरोबर काँग्रेस ज्या विचारांवर बनलेला पक्ष आहे, ते विचार शिवसेनेला मान्य नाहीत. ही एक सत्तेसाठी बनवलेली संधीसाधू आघाडी आहे.

गडकरी म्हणाले की, काँग्रेस आणि शिवसेनेत जशी विचारांची तफावत आहे, तशी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विचारांमध्येदेखील मोठी तफावत आहे. हे तीन पक्ष महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ शकत नाहीत. या आघाडीमुळे जे सरकार बनेल, त्यामुळे महाराष्ट्राचं केवळ मोठं नुकसान होणार आहे.

गडकरी म्हणाले की, शिवसेना आणि भाजपमध्ये जी युती झाली होती, ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आधारीत होती. त्यामुळेच शिवसेना आणि भाजपची युती ही देशातली सर्वात जास्त काळ टिकलेली युती ठरली. आजही आमच्या विचारांमध्ये साम्य आहे. त्यामुळेच ही युती तुटणे हे देशासाठी, विचारधारेसाठी, हिंदुत्वासाठी आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी चांगली बाब नाही.