Rahul Gandhi Press Conference: राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा; 70 वर्षात उभारलेली संपत्ती विकली जातेय
तुमचे भविष्य विकले जात आहे. तीन-चार लोकांना भेट म्हणून ही देशाची संपत्ती दिली जात आहे, असी टीका राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर राष्ट्रीय मुद्रीकरण योजनेबाबत (NMP) जोरदार निशाणा साधला. केंद्र सरकारने सर्व काही विकले. केंद्र सरकारने तरुणांच्या हातातून रोजगार हिसकावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 'मित्रांना' मदत करत आहेत. कोरोना संकटातही सरकारने मदत केली नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
रस्ते मार्ग, रेल्वे, वीज क्षेत्र, पेट्रोलियम पाईपलाइन, दूरसंचार, गोदाम, खाणकाम, विमानतळ, पोर्ट, स्टेडियम हे सर्व कुणाकडे जात आहे? हे सर्व उभारण्यासाठी 70 वर्षे लागली. मात्र आता हे तीन किंवा चार लोकांच्या हातात दिले जात आहे, तुमचे भविष्य विकले जात आहे. तीन-चार लोकांना भेट म्हणून ही देशाची संपत्ती दिली जात आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
राहुल गांधी यांनी आकडेवारीचा संदर्भ देत दावा केला की, सरकारने 400 रेल्वे स्टेशन, 150 गाड्या, पॉवर ट्रान्समिशन नेटवर्क, पेट्रोलियमचे नेटवर्क, सरकारी गोदामे, 25 विमानतळे आणि 160 कोळसा खाणी विकल्या. ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातही मक्तेदारी होती. आपण गुलामगिरीकडे वाटचाल करत आहोत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
आमचे खाजगीकरण तार्किक होते : राहुल गांधी
आम्ही खाजगीकरणाच्या विरोधात नाही. आमचे खाजगीकरण तार्किक होते. आम्ही तोट्यात असणाऱ्या कंपन्यांचे खासगीकरण केले होते. रेल्वेसारखा महत्त्वाचा विभाग खासगी केला नाही. आता एकाधिकार निर्माण करण्यासाठी खासगीकरण केले जात आहे. यामुळे भविष्यात रोजगार मिळणे बंद होईल, अशी भीती देखील राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
...तर सार्वजनिक क्षेत्र शिल्लक राहणार नाही- पी चिदंबरम
माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी म्हटलं की, कोणतेही लक्ष्य आणि प्रमाण निश्चित न करता सरकारने एवढा मोठा निर्णय घेतला आहे. कोणाशीही चर्चा केली नाही. नीति आयोगात सर्व काही ठरवले गेले. यामुळे सार्वजनिक क्षेत्र शिल्लक राहणार नाही, असं पी चिदंबरम यांनी म्हटलं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यातून 6 लाख कोटी उभारण्याची माहिती दिली आहे. तर पंतप्रधानांनी गेल्या तीन स्वातंत्र्यदिनी 100 लाख कोटींच्या पायाभूत सुविधांची पाईपलाईन जाहीर केली आहे. हा घोटाळा आहे, असा दावा चिदंबरम यांनी केला आहे.