मुंबई : काँग्रेसेचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सध्या युरोपच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी यावेळी बेल्जियममध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी रशिया (Russia) युक्रेनच्या (Ukraine) युद्धावर मोदी सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. राहुल गांधी यांना पत्रकार परिषदेमध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या संघर्षावर प्रश्न विचारण्यात आला. रशिया आणि युक्रेनच्या युद्धावर भारतात विरोधी पक्षाची नक्की भूमिका काय असा प्रश्न विचारला. यावर राहुल गांधी यांनी उत्तर देतांना म्हटलं की, 'सध्याच्या रशिया आणि युक्रेनच्या युद्धावर भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेशी विरोधी पक्ष सहमत आहे. अशा स्थितीत सरकार सध्या जे काही करत आहे त्यापेक्षा विरोधकांची काही वेगळी भूमिका असेल असे मला वाटत नाही.'
यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही - राहुल गांधी
जी-20 शिखर परिषदेच्या डिनर डिप्लोमसीमध्ये राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंना आमंत्रित न करण्याबाबत राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, 'यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही. विरोधी पक्षनेत्याला आमंत्रित न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याची गरज त्यांना का वाटली आणि हे करण्यामागे त्यांचा नेमका विचार काय आहे, हा विचार लोकांनी करायला हवा. '
'देश बदलण्याचा प्रयत्न'
राहुल गांधी यांनी यावेळी मोदी सरकारवर घणाघात केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, देश बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा देशाच्या लोकशाही संस्थांवर होत असलेल्या गोष्टींविषयी भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी म्हटलं की, भारतात भेदभाव आणि हिंसाचार नक्कीच वाढला आहे. ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत. तसेच इतर जातीच्या लोकांवरही अन्याय होत आहे.'
राहुल गांधी हे सात दिवसांच्या युरोप दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी युरोपमधील अनेक देशांना भेट देण्याचं निश्चित केलंय. तसेच ते या दौऱ्यावेळी भारतीय लोकांशी संवाद साधणार आहेत.