मुंबई : काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे युरोपच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी त्यांनी गुरुवारी (7 सप्टेंबर) बेल्जियममधील ब्रुसेल्स येथे युरोपियन संसदेतील सदस्यांसोबत बैठकीत सहभाग घेतला आहे. एमईपी अलवीना अल्मेत्सा आणि एमईपी पियरे लारौतुरौ यांनी यांच्या नेृत्वाखाली ही बैठक पार पडली. तसेच ते  यावेळी काही भारतीय उद्योगपतींची देखील भेट घेणार आहेत. यानंतर ते ब्रसेल्समध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करतील.


राहुल गांधी यांचा युरोप दौरा


पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी हे युरोपियन युनियनमध्ये वकील, विद्यार्थी आणि भारतीय वंशाच्या लोकांची भेट घेणार आहेत. त्यानंतर राहुल गांधी हे पॅरिसला रवाना होतील. राहुल गांधी हे सध्या आठवड्याभराच्या युरोप दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यावेळी ते अनेक महत्त्वाच्या बैठकींमध्ये सहभागी होणार आहेत. 






फ्रान्सच्या खासदारांसोबत घेणार बैठक


राहुल गांधी 8 सप्टेंबर रोजी फ्रान्समध्ये पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. तर  9 सप्टेंबर रोजी फ्रान्सच्या खासदारांसोबत ते बैठक करतील. यासोबतच सायन्सेस पो युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांशीही ते संवाद साधणार आहेत. पॅरिसमध्ये फ्रान्सच्या कामगार संघटनेच्या बैठकीत सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली. 


नेदरलँडचाही दौरा करणार


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी 10 सप्टेंबरला नेदरलँडला रवाना होणार आहेत. तेथे ते 400 वर्षे जुन्या लीडेन विद्यापीठाला भेट देतील आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. 11 सप्टेंबर रोजी, काँग्रेस नेते नॉर्वेला जाणार आहेत.  यावेळी ते ओस्लोमधील खासदारांना देखील भेटतील. तर भारतीयांच्या एका कार्यक्रमाला देखील ते संबोधित करणार आहेत.  काँग्रेस राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाचे आयोजन हे इंडियन ओव्हरसीज द्वारे करण्यात येत असल्याची माहिती देण्यात येत आहे.  G-20 शिखर परिषदेच्या समारोपानंतर 12 सप्टेंबर रोजी रात्री राहुल गांधी हे भारतात परतणार आहेत. 


काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी (05 सप्टेंबर) रोजी युरोपच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. याआधी राहुल गांधी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी वॉशिंग्टन, न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीयांशी संवाद साधला. दरम्यान काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने पक्षाकडून तयारी देखील सुरु करण्यात आली असून कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. पण राहुल गांधी हे या कार्यक्रमांना उपस्थित राहणार नाहीत. 


हेही वाचा : 


Rahul Gandhi: राहुल गांधींना लोकसभा सदस्यत्व बहाल करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; याचिका दाखल, पुढील आठवड्यात सुनावणीची शक्यता