हाथरस : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उत्तर प्रदेश पोलिसांवर घणाघाती टीका केली आहे.  हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर पीडितेवर बलात्कार झाला नसल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. त्यावरून उत्तर प्रदेश पोलीस आणि योगी सरकार वादात सापडलं होतं. याचं संदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.


राहुल गांधींनी ट्वीट करत म्हटलंय की, 'लज्जास्पद सत्य म्हणजे अनेक भारतीय दलित, मुस्लीम आणि आदिवासींना माणूस समजत नाहीत. मुख्यमंत्र्यांचे (उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ) व त्यांच्या पोलिसांचं म्हणणं आहे की, कुणीही बलात्कार केला नाही. कारण त्यांच्यासाठी आणि इतर अनेक भारतीयांसाठी ती कुणीही नव्हती', अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.



तपासासाठी एसआयटीला 10 दिवसांची मुदतवाढ


हाथरस प्रकरणी स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम (SIT) तपास करत असून बुधवारी एसआयटी आपला अहवाल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सोपावणार होती. मात्र आज सकाळीच एसआयटीला आणखी दहा दिवसांचा अवधी मिळाला आहे. गृहसचिव भगवान स्वरुप यांच्या नेतृत्त्वात एसआयटीचा तपास सुरु आहे. या प्रकरणात एसआयटीला तपासासाठी एक आठवड्यांचा मुदत देण्यात आली होती. दरम्यान तपसासाठी आणखी 10 दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे.


Exclusive | हाथरस प्रकरण : गावच्या प्रधानांची कबुली; म्हणाले, घटनास्थळी उपस्थित होते आरोपी संदीप आणि राम कुमार


पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही


उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. काही दिवसांपूर्वी पीडितेचा शवविच्छेदन अहवाल समोर आला होता. धक्कादायक बाब म्हणजे या अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही. परिणामी या अहवालाचा थेट फायदा स्वाभाविकपणे आरोपींना होणार आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे पीडितेच्या कुटुंबीयांना न सांगताच पोलिसांनी गुपचूप अंत्यसंस्कार केले, त्याचप्रमाणे या शवविच्छेदन अहवालातही छेडछाड केली का असाही प्रश्न उपस्थित होत आहेत.


दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने पीडितेचं शवविच्छेदन केलं. या शवविच्छेदन अहवालानुसार, "पीडितेचा मृत्यू मानेचं हाड मोडल्याने झाला आहे." तसंच गळ्यावर जखमांचे निशाण आहे. पीडितेला ब्लड इन्फेक्शन झालं आणि हार्ट अटॅकही आला होता. या तरुणीचा मृत्यू 29 सप्टेंबर सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी झाला होता, असं अहवालात नमूद केलं आहे.


14 सप्टेंबर रोजी पाशवी अत्याचार, 29 सप्टेंबरला अखेरचा श्वास


14 सप्टेंबर रोजी हाथरसमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर पाशवी अत्याचार करण्यात आले. आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठत तरुणीची जीभ कापली. यानंतर तिला अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला सोमवारी (28 सप्टेंबर) दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे तिने मंगळवारी सकाळी प्राण सोडले. या प्रकरणातील चार आरोपींना पकडलं असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.



महत्त्वाच्या बातम्या :