Raghuram Rajan: जागतिक स्तरावर प्रमुख अर्थतज्ज्ञांमध्ये आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे रघुराम राजन. भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर असलेल्या रघुराम राजन यांचा आज जन्मदिवस आहे. 2013 साली रघुराम राजन यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेची धुरा हाती घेतली. त्यावेळी रुपयाची किंमत घसरत होती आणि महागाईमुळे देशाचे नागरिक त्रस्त झाले होते. अशा वेळी रघुराम राजन यांनी आरबीआयचे गव्हर्नर म्हणून महत्वाची भूमिका बजावली.
रघुराम राजन यांनी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे आर्थिक सल्लागार म्हणूनही काम केलं आहे. सध्या ते युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेस या ठिकाणी अध्यापनाचे काम करत आहेत.
भोपाळ ते अमेरिका असा प्रवास
रघुराम राजन यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1964 साली मध्य प्रदेशातील भोपाळ येथे एका तामिळ परिवारात झाला. सन 1985 साली रघुराम राजन यांनी दिल्ली आयआयटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. त्यावेळी त्यांनी आयआयटी दिल्लीचा बेस्ट ऑल राऊंड अचिव्हमेन्ट अॅवार्ड मिळाला होता. त्यानंतर त्यांनी अहमदाबादमधून बिझनेस अॅडमिनीस्ट्रेशनमधून पोस्ट ग्रॅज्यूएशन पूर्ण केलं. त्यांनी अर्थशास्त्रात अमेरिकेतील एमआयटीमधून पीएचडी घेतली, नंतर शिकागो विद्यापीठात अध्यापनाचे काम सुरु केलं.
आतंरराष्ट्रीय नाणे निधीमध्ये (IMF) 2003 साली रघुराम राजन यांची मुख्य आर्थिक सल्लागार पदी निवड झाली. असे पद धारण करणारे ते आएमएफच्या इतिहासातील सर्वाधिक तरुण आर्थिक सल्लागार होते. रघुराम राजन यांनी 2005 साली यूएस फेडरल रिझर्व्हमध्ये 'क्रिटिकल ऑफ द फायनान्शिएल सेक्टर' या विषयावर एक शोध निबंध सादर केला. यामध्ये त्यांनी जग हे आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी रघुराम राजन यांना कोणीही गांभीर्यानं घेतलं नाही. पण पुढच्या तीनच वर्षात अमेरिकेत आणि जगभरात आर्थिक मंदीचं संकट आलं. पण रघुराम राजन यांनी मांडलेल्या त्या निबंधाचा फायदा नंतर अमेरिकेला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी झाला.
आंतरराष्ट्रीय नाणे निधीत काम केल्यानंतर 2008 साली रघुराम राजन यांनी तत्कालीन भारतीय पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून काम सुरु केलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च स्तरीय आर्थिक सुधारणा समितीची स्थापना करण्यात आली. 2008 सालच्या जागतिक आर्थिक मंदीच्या कारणांवर त्यांनी एक दीर्घ निबंध सादर केला.
रघुराम राजन यांची 2013 साली आरबीआयच्या गव्हर्नर पदी निवड झाली. आरबीआयचे गव्हर्नर म्हणून काम करताना त्यांनी कधीही राजकारण्यांच्या खूश करण्यासाठी निर्णय घेतले नाहीत. राजकीय फायद्यापेक्षा त्यांनी मध्यम वर्गीय लोकसंख्येच्या फायद्यासाठी निर्णय घेण्याला प्राधान्य दिले. मध्यमवर्गीय नागरिकांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या महागाईला आळा घालणे हा त्यांचा प्रमुख अजेंडा राहीला. त्यासाठी त्यांनी मायक्रोफायनान्शिएल बँकांच्या स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कार्यकालात व्याज दर कायम कमी राहिले, त्यामुळे महागाई हाताबाहेर गेली नाही. सत्ताधाऱ्यांनी अनेक वेळा त्यांच्या धोरणांवर टीका केली पण त्यांनी आपला निर्णय कधीही बदलला नाही. त्याचा कार्यकालात रुपया तुलनेनं मजबूत झाला.
नोटबंदीच्या निर्णयावर टीका
रघुराम राजन हे सातत्याने भारतातील मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांचे टीकाकार राहीले आहेत. मोदी सरकारने आरबीआयला विश्वासात न घेता नोटबंदी करण्याचा निर्णय घेतला, या निर्णयावर रघुराम राजन यांनी टीका केली आहे. तसेच मोदी सरकारच्या जीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीवरही त्यांनी टीका केली. त्यांच्या मते, नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीतील त्रुटींचा मोठा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसलाय. जीएसटी आणि नोटाबंदी लागू होण्यापूर्वी चार वर्षापर्यंत भारताच्या विकासदरांमध्ये वेगाने वाढ होत होती. नंतरच्या काळात हा विकास दर मंदावला तोही अशावेळी ज्या वेळी जागतिक अर्थव्यवस्था झपाट्यानं विकास करत होती.
रघुराम राजन यांनी मोदी सरकारच्या काळात आरबीआयच्या भूमिकेवरही शंका उपस्थित केली होती. आरबीआय ही स्वतंत्र संस्था असून राजकीय फायद्यासाठी तिचा वापर करण्यापेक्षा देशाच्या अर्थव्यवस्था टिकवणं महत्वाचं आहे असं मत त्यांनी मांडलं होतं. कोरोना काळातही त्यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक निर्णयांवर टीका केली आहे. भारतीय अर्थव्यवस्था एका व्यक्तीच्या मर्जीवर चालू शकत नाही, असं म्हणत रघुराम राजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदींना लक्ष्य केलं होतं.
रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ते युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेस या ठिकाणी अध्यापनाचे काम करत आहेत. 2016 साली टाईम मॅगेझिनने त्यांचा जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश केला. 2018 साली आम आदमी पक्षाने त्यांना राज्यसभेच्या खासदार पदाची ऑफर दिली होती पण रघुराम राजन यांनी ती नाकारली. सध्या आपण अध्यापणाच्या कामात खुश आहोत असे ते म्हणतात.