Vijay Sethupathi Birthday: टॉलिवूडचा सुपरस्टार, निर्माता, संवाद लेखक आणि गीतकार विजय सेतुपतीला आज कोण ओळखत नाही. विजय सेतुपतीने आतापर्यंत एका पेक्षा एक अभिनय साकारुन एक वेगळी छाप उमटवली आहे. त्याच्या चित्रपटांची अगदी चातकासारखी वाट पाहिली जाते. विजय सेतुपती आज आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहे.
आज सुपरस्टार असलेल्या विजय सेतुपतीला अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नाही. त्याचा जन्म तामिळनाडूतील राजपालयम या गावातील अगदीच सामान्य परिवारात झाला. तो सहावीत शिकत असतानाच त्याच्या परिवाराने चेन्नईला स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. त्याने धनराज बेद महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली. खूपच हालाखीच्या परिस्थितीत त्याने दिवस काढले.
PHOTO | वाढदिवशीच ज्वाला गुट्टाचा दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत साखरपुडा
सेल्समन म्हणून काम केलं
लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या विजयला त्याच्या कमी उंचीमुळे आणि चेहऱ्यामुळे कुठेही संधी मिळायची नाही. पदवी घेतल्यानंतर उदरनिर्वाहासाठी त्याने एका रिटेल स्टोअरमध्ये सेल्समनची नोकरी सुरु केली. त्यानंतर एका फास्ट फूडच्या दुकानात कॅशिअरची नोकरीही केली. आपल्या तीन भावंडांची आणि परिवाराची आर्थिक गरज भागवण्यासाठी विजय सेतुपतीने दुबईला जायचा निर्णय घेतला. परंतु या नोकरीत मन न लागल्याने त्याने भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
असा मिळाला ब्रेक
दुबईवरुन परत आल्यानंतर विजयने चेन्नईचा एक थिएटर ग्रुप जॉईन केला. या ठिकाणी तो अभिनयासोबतच अकाउंटचे कामही करायचा. या थिएटर ग्रुपमध्ये काम करताना त्याने अभिनयातील बारीक पैलू शिकून घेतले. त्याला आता तामिळ चित्रपटात सपोर्टिंग अॅक्टरची भूमिका मिळू लागली. त्यानंतर विजय सेतुपतीने टीव्हीवरही काम करायला सुरुवात केलं. पण त्याला सर्वात मोठा ब्रेक मिळाला तो रामासामीच्या Thenmerku Paruvakaatru या चित्रपटातून. विजय सेतुपतीने या चित्रपटात लीड रोल केला. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आणि इथूनच विजय सेतुपतीच्या करिअरने वेग पकडला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.
कोरोनाच्या प्रादुर्भावात दाक्षिणात्य सुपरस्टार नितिननं बांधली लग्नगाठ; फोटो व्हायरल
'सुपर डीलक्स' ची शिल्पा असो वा 'विक्रम वेधा' चा वेधा असो, ट्रान्सजेन्डरच्या भूमिकेपासून ते व्हिलनच्या भूमिकेपर्यंत विजय सेतुपतीने वेगवेगळ्या भूमिका केल्या. आपल्या प्रत्येक भूमिकेतून विजयने दर्जेदार अभिनय साकारले.
'96' मधला दमदार अभिनय
विजय सेतुपतीने केवळ कॉमेडी ड्रामा अथवा थ्रिलर चित्रपटातच काम केलं नाही तर प्रेम कुमार निर्मित चित्रपट '96' मध्येही आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. 2018 साली प्रदर्शित झालेला हा एक रोमॅन्टिक ड्रामा चित्रपट आहे. विजयने या चित्रपटात रामचंद्रन नावाच्या फोटोग्राफरची भूमिका केली आहे तर जानूच्या भूमिकेत अभिनेत्री त्रिशाने काम केलंय. शाळेत असताना हे दोघे एकमेकांवर प्रेम करायचे. त्यानंतर तब्बल 22 वर्षांनी त्याची भेट एका रियुनियन पार्टीमध्ये होते आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. प्रत्येक प्रेमी युगुलाने पहावा असा हा चित्रपट आहे. विजय सेतुपतीला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळालाय.
पोंगलच्या पार्श्वभूमीवर विजय सेतुपती आणि सुपरस्टार विजय या दोघांचा 'मास्टर' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सध्या दक्षिण भारतात धुमाकूळ घालतोय.