मुंबई : राहुल द्रविडनंतर टीम इंडियाची नवीन 'वॉल' म्हणून ओळख मिळालेला कसोटी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराचा आज म्हणजेच 25 जानेवारीला 33वा वाढदिवस आहे. पुजाराने आपल्या खात्रीशीर फलंदाजीमुळे अनेक वेळा भारतीय संघाला कठीण परस्थितीमधून बाहेर काढलं आहे. नुकतंच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत चेतेश्वर पुजारा एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढला.
सिडनी आणि ब्रिस्बेन कसोटीत पुजाराने आपल्या शरीरावर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे वार झेलेले. सिडनी कसोटीत पुजाराने 50 आणि 77 धावांची खेळी रचली. तर ब्रिस्बेनमधील निर्णायक कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने 56 धावांची खेळी करुन मालिका विजयात मोलाचा वाटा उचलला.
चेतेश्वर पुजारा टीम इंडियाची 'द वॉल' बनत आहे. पुजाराने स्वत:वर पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूडचे हल्ले झेलेले, परंतु तो क्रिजवर तळ ठोकून उभा राहिला. चेतेश्वर पुजाराने एका बाजून खिंड लढवली आणि विकेट्स जाऊ दिल्या नाही. त्यामुळेच शुभमन गिल आणि रिषभ पंतने खुलून फलंदाजी केली. चेतेश्वर पुजाराच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
वडील आणि काकाही क्रिकेटपटू होते
25 जानेवारी 1988 रोजी गुजरातच्या राजकोटमध्ये जन्मलेल्या चेतेश्वर पुजाराचं कौशल्य पाहून त्याचे वडील अरविंद पुजारा आणि आई रीमा पुजारा यांनी त्याला बालपणापासूनच क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं. चेतेश्वर पुजाराचे वडील अरविंद पुजारा सौराष्ट्र संघासाठी रणजी चषकात खेळले आहेत
तर चेतेश्वरचे काका बिपीन पुजारा यांनी रणजीमध्ये सौराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्त्व केलं आहे. पुजाराला क्रिकेटचं सुरुवातीचं प्रशिक्षण वडिलांकडूनच मिळाली होती. चेतेश्वर पुजारा 17 वर्षांचा असताना त्याच्या आईचं निधन झालं. फलंदाजीचं उत्तम तंत्र असलेल्या चेतेश्वर पुजाराने 2010 मध्येऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरुमध्ये कसोटी क्रिकेटरमध्ये पदार्पण केलं होतं.
द्रविडनंतर बनला टीम इंडियाची भिंत
राहुल द्रविडने 2012 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर चेतेश्वर पुजाराला कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची जबाबदारी मिळाली. त्याने त्या वर्षी न्यूझीलंड संघाविरोधात आपलं नाणं खणखणीत वाजवत आपलं पहिलं कसोटी शतक साजरं केलं. न्यूझीलंडविरोधातील हैदराबाद कसोटीत पुजाराने 159 धावांची शानदार खेळी रचली होती.
पुजाराने आतापर्यंत 81 कसोटी सामन्यात 47.74 च्या सरासरीने 6111 धावा केल्या आहेत. त्याने इंग्लंडविरुद्धच्या अहमदाबादमधील सामन्यात कसोटी कारकीर्दीतील सर्वोत्तम 206 धावांची खेळी रचली होती. कसोटी क्रिकेटमध्ये पुजाराच्या नावावर 18 शतक आणि 28 अर्धशतकं जमा आहेत. कसोटी कारकीर्दीत चेतेश्वर पुजाराने 3 दुहेरी शतकं केली आहेत.
13 फेब्रुवारी 2013 रोजी चेतेश्वर पुजाराने त्याची मैत्रीण पूजा पाबरीसोबत लग्न केलं. चेतेश्वर पुजारा आणि पूजाला एक मुलगी असून तिचं नाव अदिती आहे.